प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे : दीपावली अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात
प्रतिनिधी /सातारा
भारतीय संस्कृतीतील दीपोत्सव हा प्रकाशाचा उत्सव आहे. मानवी जीवनातील वाटचालीत माणसांना दोन गोष्टी वारसा हक्काने मिळालेल्या आहेत. एक म्हणजे भाषा व दुसरी गोष्ट म्हणजे संस्कृती. सूर्य मावळल्यानंतर पडणारा अंधार हा निसर्ग निर्मित असतो, मात्र मुल्य पायदळी तुडवल्यावर जो अंधार पडतो तो मानव निर्मित् असतो. हा अंधार दूर करण्यासाठी समाजात काही विवेकदीप प्रज्वलित केले पाहिजेत. हाच विवेकदीप शब्दांच्या माध्यमातून देवून ‘तरुण भारत’चा दीपावली अंक हा समाजमनातील अंधार दूर करण्याचे काम करेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक व प्रख्यात व्याख्याते प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.
सन 2021 च्या ‘तरुण भारत’ च्या दीपावली अंकाचा प्रकाशन सोहळा साहित्य शारदेच्या दरबारातील मानकरी असलेल्या प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्या हस्ते व कोरोना विरुध्दच्या लढाईत रुग्णांसाठी जीवनज्योत बनून राहिलेल्या जिल्हय़ाचे शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, आवृत्तीप्रमुख दीपक प्रभावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठय़ा उत्साहात झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जाहिरात प्रमुख संजय जाधव, डेस्क इंचार्ज राजेंद्र वारागडे, वितरण विभाग प्रमुख मंदार कोल्हटकर, प्रशासकीय विभाग प्रमुख सागर कोठावळे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. पाटणे पुढे म्हणाले, एक शब्दांचा उत्सव हा देशात कोठेही नाही फक्त महाराष्ट्रातच साहित्य संमेलनाच्या माध्यमातून भरत असतो. तर दीपावलीमध्ये दुसरा शब्दांचा महोत्सव हा दीपावली अंकांच्या माध्यमातून भरत असतो. ‘तरुण भारत’ हे नावच राज्यभरातील वाचकांसाठी एक उर्जास्त्राsत आहे. ‘तरुण भारत’चा यावर्षीचा दीपावली अंक देखील मान्यवर साहित्यिकांच्या शब्दमैफिलीने बहारदार झालेला आहे. विविधरंगी साहित्याच्या मेजवानीने भरलेले ताट असून शब्दोत्सवांची ही थाळी वाचकांचे प्रबोधन करेल.
‘तरुण भारत’च्या कार्यालयात आल्यावर दीपक प्रभावळकर यांच्याशी बोलताना शब्दोत्सव सुरुच असतो. त्याच ‘तरुण भारत’ मध्ये वारीच्या निमित्ताने वाचकांसाठी देण्यात येणाऱया सदरातील शब्दपालखीचा मी वारकरी असल्याचा मला अभिमान वाटतो. सध्या कोरोनामुळे समाजाला, भयग्रस्त झालेल्या मनांना आधार देण्यासाठी साहित्यिकांनी काम करण्याची गरज असल्याची भावनाही व्यक्त करत प्रा. डॉ. पाटणे यांनी दीपावली अंकास शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी डॉ. सुभाष चव्हाण यांनी ज्ञानसंपन्न मान्यवरांच्या उपस्थित होत असलेला ‘तरुण भारत’ च्या दीपावली अंकाचा प्रकाशन सोहळा खऱया अर्थाने आगळा वेगळा आहे. या अंकातील साहित्य ज्ञानाची शिदोरी ठरणारी असून त्यातील कविता, व्यंगचित्रे, अभ्यासपूर्ण लेख, कथा याचा वाचकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले.
साहित्य विश्वातील आठवणींना उजाळा
या प्रकाशन सोहळय़ात ‘तरुण भारत’ च्या कार्यालयात गप्पांची शब्दमैफिलही रंगतदार ठरली. साहित्य विश्वातील आठवणींना उजाळा देताना साहित्यप्रेमी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते शरद पवार यांच्यापर्यंत आणि इतिहासापासून कादंबरी, कविता आणि साहित्यिक पु. ल. देशपांडेपासून ना. धो. महानोर यांचे किस्से नव्याने ऐकायला मिळाले. सध्या साहित्यिकांना राजकारणापासून दूर ठेवण्यात येत असल्याची खंतही व्यक्त झाली. राजकारण, समाजकारण आणि साहित्य क्षेत्रांनी एकत्रितपणे वाटचाल केल्यास समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतील याचा विचार होण्याची गरजही व्यक्त झाली.









