पुलाची शिरोली / वार्ताहर
‘पुलाची शिरोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा’ या दैनिक तरुण भारत मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन जिल्हा परिषदेकडून तत्काळ औषधांचा पुरवठा करण्यात आला. याबद्दल रुग्ण व ग्रामस्थांच्याकडून तरुण भारतचे कौतुक होत आहे.
शिरोली आरोग्य केंद्र हे सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देणारे आहे. येथे शिरोलीसह परिसरातील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. सध्या हवामानातील बदलामुळे सर्दी खोकला ताप अंगदुखी डोकेदुखी अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. यापैकी खोकला आणि सर्दी असलेल्या रुग्णांना औषधांचा तुटवडा जाणवत आहे. विशेषतः कफ सिरफ औषध गेले दिड महिन्यांपासून येथे शिल्लक नाही. याबाबत येथील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.जेसिका अँन्ड्रोस यांनी जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाकडे ऑनलाईन मागणी केली आहे. पण त्यांच्याकडून औषधांचा पुरवठा झाला नाही. याबाबत मंगळवारी दैनिक तरुण भारत मधून वस्तुस्थिती प्रसिद्ध केली होती. याची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा परिषदेकडून मंगळवारी औषध पुरवठा करण्यात आला. याबद्दल ग्रामस्थ व रुग्णांच्या कडून तरुण भारतचे अभिनंदन व्यक्त होत आहे.