प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेत दिवाळी अंकाचे स्थान वेगळे आहे. दिवाळीचा फराळ सर्वत्र असतो मात्र दिवाळी अंकाच्या रूपाने साहित्यिक मेजवानी आणि दिवाळीचा फराळ हे चित्र मात्र महाराष्ट्रातच आढळते. या परंपरेत `तरुण भारत’चा दिवाळी अंक हा रसिक वाचकांसाठी दरवर्षी बौद्धिक मेजवानी देणारा असतो. ती परंपरा यंदाही जपली आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा रोड मराठाकार प्रा. डॉ. वसंतराव मोरे यांनी काढले.
तरुण भारत'च्या यंदाच्या वर्षीच्या दिवाळी अंकाचे येथील दसरा चौकातील कार्यालयात सोमवारी डॉ. वसंतराव मोरे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या प्रसंगी ते बोलत होते. डॉ. मोरे म्हणाले, दीपोत्सव हा अंधाराला नष्ट करणारा आहे. अंधार आहे म्हणूनच प्रकाशाला मूल्य आहे आणि प्रकाश आहे म्हणून अंधाराला मूल्य आहे. मनातील वाईट गोष्टी बाजूला ठेवण्याचे काम साहित्य करते.तरुण भारत’चा दिवाळी अंकही नेहमीच हे काम करत आला आहे. या अंकात असणारे लेख वाचकांच्या मनातील नकारात्मक विचार बाजूला करुन सकारात्मक आयुष्य जगण्याची उमेद देतात. गंभीर विषयांच्या लेखांची हलक्या फुलक्या शब्दांत मांडणी, जगण्याचे अनुभव सांगणारे लेख, परिसंवाद, कथा, कविता, व्यंगचित्रे आणि राशिभविष्य यांचा अनोखा संगम या दिवाळी अंकात पहावयास मिळतो. हा दिवाळी अंक वाचकांच्या पसंतीस खरा उतरेल, असा विश्वास डॉ. मोरे व्यक्त केला. अंकाच्या मांडणी आणि संकलनाचीही डॉ. मोरे यांनी यावेळी प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे यांनी केले. यावेळी जाहिरत विभाग प्रमुख (ग्रामीण) आनंद साजणे, जाहिरात प्रमुख (शहर) मंगेश जाधव, वरिष्ठ प्रतिनिधी सुधाकर काशिद, प्रशासन अधिकारी राहुल शिंदे, वरिष्ठ उपसंपादक यशवंत लांडगे, वितरण विभाग प्रमुख सचिन बरगे, जाहिरात मांडणी विभाग प्रमुख विजय शिंदे, प्रॉडक्शन इन्चार्ज राजू नंदगडकर आदी उपस्थित होते.
`तरुण भारत’कडून समाजप्रबोधनाचे काम
सडेतोड लिखाण आणि निःपक्षपातीपणा हे वेगळेपण जपत `तरुण भारत’ने नेहमीच समाजप्रबोधणाचे काम केले आहे, असे गौरवोद्गार डॉ. मोरे यांनी केले.
.









