वॉक घेत असलेल्या गोल्फ मैदानाला टाळे
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
लॉकडाऊन काळात महाबळेश्वर येथे फिरायला आलेल्या प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना ‘तरुण भारत’चा दणका बसला. अनिल अंबानी हे आपली पत्नी टिना अंबानींसह ज्या मैदानावर इव्हिनिंग वॉक घेत असल्याचे वृत्त ‘तरुण भारत’ने सोशल मीडीयाच्या माध्यमातून प्रसिद्ध करताच महाबळेश्वर पालिकने याची तत्काळ दखल घेत गोल्फ मैदानाला टाळे ठोकले. या धडाकेबाज कारवाईमुळे ‘तरुण भारत’ व महाबळेश्वर पालिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना उद्योगपती अनिल अंबानी हे पत्नी टीना अंबानींसह महाबळेश्वर येथे तीन-चार दिवसांपासून तळ ठोकून आहेत. नित्यक्रमानुसार ते सायंकाळी येथील गोल्फ मैदानावर वॉक घ्यायचे. पण याची माहिती मिळताच या मैदानावर अनेकांची वॉकसाठी गर्दी व्हायला लागली. याचे व्हिडीओ ‘तरुण भारत’ला मिळाले. त्याचे सोशल मीडीयावर वृत्त प्रसिद्ध होताच संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली. कोरोनाच्या काळात गर्दी होत असल्यामुळे नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे पालिकेने कडक पाऊल उचलले आणि गोल्फ मैदानाची मालकी असलेल्या संस्थेला नोटीस बजावत मैदानाला टाळे ठोकले. त्याचबरोबर दंडात्मक कारवाईचाही इशारा दिला आहे. पालिकेने नोटीस बजावल्यामुळे दि क्लबने गोल्फ मैदानाला टाळे ठोकले आहे. आता या मैदानावर वॉकसाठी उद्योगपती अनिल अंबांनीसह सर्वांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात निवांत राहण्यासाठी आलेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांचे चांगलेच वांदे झाले आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणुन महाबळेश्वर हे प्रसिध्द आहे. येथील थंड हवा आणि निसर्ग पाहण्यासाठी देशातील अनेक नामवंत हे नेहमी आपल्या कुटूंबाबरोबर येथे वरचेवर येत असतात. उद्योग विश्वात ज्यांच्या नावाचा बोलबाला आहे, असे अंबानी बंधु हे देखील आपल्या कुटूंबाबरोबर वरचेवर महाबळेश्वरला भेट देतात. मुकेश अंबानी यांचेही महाबळेश्वरवर नितांत प्रेम आहे त्यांनी आपली मुलीचा साखरपुडय़ाचा कौटुंबिक सोहळा येथेच आयोजित केला होता. मुकेश अंबानीप्रमाणे त्यांचे बंधु अनिल अंबानी हे देखिल नेहमी कुटूंबासह महाबळेश्वरला नेहमी येत असतात. सध्या लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. याच काळात अनिल अंबानी हे आपली पत्नी टिना अंबानीसह महाबळेश्वर येथे आले आहेत.
अनिल अंबानी कुटुंबासमवेत सध्या देशातील डायमंड किंग म्हणुन प्रसिध्द असलेले उद्योगपती अनुम मेहता यांच्या लाल बंगल्यात मुक्कामी आहेत. गेली अनेक दिवस येथे मुक्कामी असलेले अनिल अंबानी यांना रोज सकाळ आणि संध्याकाळी वॉकसाठी बाहेर पडण्याची सवय आहे. मुंबई असो वा महाबळेश्वर ते वॉक कधीच चुकवत नाहीत. वॉकची सवय असलेले अनिल अंबानी हे रोज सायंकाळी आपली पत्नी टिना अंबानीसह येथील गोल्फ मैदानावर वॉक घेण्यासाठी येतात. याच ठिकाणी गावातील काही मोजकी मंडळी देखील वॉकसाठी नियमित येत असतात. सध्या या मैदानावर अनिल अंबानी हे आपल्या पत्नीसह रोज वॉकसाठी येतात याची खबर शहरात पसरली. त्यामुळे वॉकसाठी जी काही मंडळी इतर ठिकाणी जात होती त्यांनी आपली रोजची जागा बदलुन येथील गोल्फ मैदानावर वॉक सुरू केला. त्यामुळे हळुहळु या मैदानावर वॉकसाठी नागरिकांची गर्दी होवु लागली. याचे व्हिडीओ ‘तरुण भारत’च्या हाती लागले.
लॉकडाऊनमध्ये संचारबंदी असून कोणालाही बाहेर पडता येत नाही असे नियम असतानाही उद्योगपती हे नियमित वॉक घेण्यासाठी गोल्फ मैदानावर येतात ही खबर पालिकेच्या मुख्याधिकाऱयांना मिळाली. त्यांनी तातडीने याबाबत खात्री करून घेवुन गोल्फ मैदानाची मालकी असलेल्या दि क्लब या संस्थेच्या सचिवांना नोटीस काढली. या नोटीसमध्ये मुख्याधिकाऱयांनी म्हटले आहे की सध्या लॉकडाउन नियामांतर्गत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे असे असताना आपल्या मालकीच्या गोल्फ मैदानावर शहरातील अनेक नागरिक इव्हिनिंग वॉकसाठी येत आहेत. ही नोटीस प्राप्त होताच तातडीने गोल्फ मैदान वॉकसाठी बंद करण्यात यावे व या ठिकाणी वॉकसाठी नागरिकांना मनाई करण्यात यावी, अन्यथा आपले विरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, भा द वि कलम 188 तसेच भारतीय साथ रोग अधिनियम 1897 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
पालिकेने बजावलेल्या या नोटीसीची दि क्लबने गंभीर दखल घेवुन नोटीस मिळताच तातडीने गोल्फ मैदानाला टाळे ठोकण्यात आले आहेत. तसेच ही नोटीस प्रवेशव्दारावर लावुन नागरिकांना रविवारपासुन हे मैदान बंद करण्यात आले आहे. पालिकेने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे शहरातुन कौतुक होत आहे. दरम्यान आता इव्हिनिंग वॉकसाठी कुठे जायचे हा प्रश्न उद्योगपती अनिल अंबानी यांना पडला आहे.








