गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती
प्रतिनिधी / बेळगाव
अन्यायाशी झुंज देत मागील शंभर वर्षात प्रगतीची झेप घेणाऱया ‘तरुण भारत’च्या हिंडलगा येथील कार्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी दिमाखात पार पडले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अत्याधुनिक कार्यालयाला भेट देऊन डॉ. प्रमोद सावंत यांनी तरुण भारतचे कौतुक केले.

हिंडलगा येथे ‘तरुण भारत’चे कार्पोरेट कार्यालय सुरु करण्यात आले आहे. सुसज्ज अशा कार्यालयाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फीत कापून उद्घाटन केले. संपूर्ण कार्यालयाचा फेरफटका मारत प्रत्येक विभागाची माहिती जाणून घेतली. वृत्तपत्र क्षेत्रात ‘तरुण भारत’ने नेहमीच नाविन्याला प्राधान्य दिले असून हे कार्पोरेट कार्यालय त्याचाच एक भाग आहे, असे गौरवोद्गार सावंत यांनी काढले.
डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबरच ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख व सल्लागार प्रमुख किरण ठाकुर, कार्यकारी संचालिका रोमा ठाकुर, संपादक जयवंत मंत्री, ज्येष्ठ पत्रकार मनीषा सुभेदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी लोकमान्य सोसायटीचे सीईओ अभिजीत दिक्षीत, सीएफओ वीरसिंग भोसले, गोवा आवृत्तीचे निवासी संपादक सागर जावडेकर, जाहिरात विभाग प्रमुख उदय खाडीलकर, व्यवस्थापक गिरीधर शंकर, प्रिटिंग विभाग प्रमुख धैर्यशील पाटील, एचआर संतोष घोरपडे यासह तरुण भारत परिवारातील सदस्य उपस्थित होते.









