लैंगिक अत्याचारप्रकरण
प्रतिनिधी / पणजी
लैंगिक अत्याचारप्रकरणी निर्दोष सुटलेल्या तेहलकाचा माजी संपादक तरुण तेजपाल याला म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या हमीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
न्या. शेरीन पॉल यांनी सदर जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. सदर खटल्याच्या फेर सुनावणीवेळी संशयिताला न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. चुकून गैरहजर राहावे लागले तर न्यायालयाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. अपरिहार्य कारणास्तव एखाद्यावेळी गैरहजर राहिल्यास लगेच संबंधित न्यायालयाला त्याची कल्पना द्यावी लागेल व तपास यंत्रणेलाही कळवावे लागेल व वकिलाच्यामार्फत उपस्थिती दर्शवावी लागेल.
या प्रकरणात आपण संशयित आरोपी नाही, असा वाद उपस्थित करता येणार नाही. कारणाशिवाय सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी अनावश्यकरित्या करता येणार नाही. या खटल्याशी संबंधित असलेल्या कुठल्याही व्यक्तीशी पडताळणा करता येणार नाही, आश्वासन अथवा धमकी देता येणार नाही, असे त्यात म्हटले आहे.
दि. 21 मे 2021 रोजी सत्र न्यायालयाने सदर संशयिताला निर्दोष ठरविले होते. या निवाडय़ाला गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सदर आव्हान न्यायपीठाने दाखल करुन घेऊन संशयित आरोपीने नव्याने जामिनासाठी अर्ज करावा, असा आदेश दिला होता.









