मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर
प्रतिनिधी /पणजी
आपल्या सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी तरुण तेजपाल याने आता सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केल्याने मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणातून सत्र न्यायालयाने तेहलका डॉट कॉम नामक नियतकालिकेचा तत्कालीन संपादक तरुण तेजपाल याला निर्दोष ठरविले होते. या निवाडय़ातील त्रुटी स्पष्ट करून पोलिसांनी सदर निवाडय़ाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
उच्च न्यायालयातील सदर सुनावणी गुप्त पद्धतीने व्हावी, ती तिसऱया कोणा व्यक्तीच्या कानी पडू नये म्हणून बंद खोलीत व्हावी अशी याचना तरुण तेजपाल याने उच्च न्यायालयासमोर केली होती. सदर याचना फेटाळल्याने आता त्याने सर्वोच्च न्यायालयासमोर आव्हान दिले आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उच्च न्यायालयातील सुनावणी घेतली जाऊ नये, अशी विनंती केल्याने उच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे.









