प्रतिनिधी/ मडगाव
कुंकळळी पोलीस स्थानकाच्या हद्दीत खेडे-पाडी (केपे) येथे काल रविवारी सकाळी कपडे धुण्यासाठी घराच्या मागच्या बाजूला असलेल्या ओहोळावर गेलेल्या हनिशा महादेव वेळीप (19 वर्षे) या तरुणीचा मृतदेह ओहोळात पाण्यावर तरंगताना आढळून आला तर या घटनेनंतर तिचा बॉयप्रेंड सर्वेश गावकर (22 वर्षे) याने कावरे-पिर्ला (केपे) येथे गळफास लावून घेतला. या दुर्दैवी घटनेमुळे खेडे-पाडी गाव हादरला असून गावात हे प्रकरण खुनाचेच असल्याची चर्चा आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमार तसेच उपअधीक्षक साहिल तसेच कुंकळळी पोलीस स्थानकाचे निरीक्षक तपास करीत होते.
उपलब्ध माहिती प्रमाणे, हनिशा काल सकाळी आपल्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या ओहोळावर कपडे धुण्यासाठी गेली होती. बराच उशिर झाला तरी घरी परतली नसल्याने घरची मंडळी तिच्या शोधार्थ ओहोळावर गेली असता तिचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. तिचा मृतदेह तिच्या काकाने पाण्यातून वर काढला.
यावेळी तिचा बॉयप्रेंड सर्वेश याला खेडे-पाडी गावात फिरताना अनेकांनी पाहिले होते. हनिशाचा मृतदेह पाण्यात सापडल्यानंतर सुमारे अर्धातास ते तासभरात सर्वेशने सुमारे 23 किलो मीटर अंतरावर असलेल्या आपल्या कावरे-पिर्ला गावात जाऊन झाडाला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला.
महिन्याभरापूर्वी ‘लव्ह ब्रेकअप’
हनिशा व सर्वेश ही दोघे एकमेकाच्या प्रेमात होती. मात्र, एक महिन्यापूर्वी त्यांच्यात ‘ब्रेकअप’ झाला होता. तरी सुद्धा सर्वेश हनिशाच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत होता. ब्रेकअप नंतरही तो तिच्या घरी जायचा. हनिशा ओहोळावर कपडे धुवायला किती वाजता जाते, पुन्हा कधी घरी येते इथपासून त्याला सर्व माहिती ठाऊक होती.
हनिशाचा मृतदेह ओहोळात सापडण्यापूर्वी सर्वेश खेडे-पाडी गावात आला होता अशी माहिती तपास यंत्रणेसमोर आली आहे. खेडे गावातील किमान दोन-तीन व्यक्तींनी त्याला पाहिले होते. ‘लव्ह ब्रेकअप’ झाल्यानंतर सर्वेश वैफल्यग्रस्त झाला होता. फेसबुकच्या माध्यमांतून तो दोघांची छायाचित्रे व्हायरल करायचा. त्यात आपल्याला सोडून अन्य दुसऱया व्यक्तीकडे तुझे लग्न कसे होते ते आपण पाहतो अशा पद्धतीने तो तिला धमकावत होता, अशी माहिती पुढे आली होती.
हे प्रकरण गुंतागुतीचे पण…
हनिशाचा मृतदेह ओहोळात सापडणे व नंतर सर्वेशने आत्महत्या करणे हे प्रकरण फारच गुंतागुतीचे आहे. त्यात दोघांचाही बळी गेल्याने या प्रकरणाचा तपास पुढे नेणे पोलीस यंत्रणेलाही आत्ता शक्य नाही. दोघांपैकी एक व्यक्ती जीवंत असती तर पोलिसांना प्रकरण हाताळणे शक्य झाले असते. हनिशाचा मृतदेह ओहोळात सापडल्याने कुंकळळी पोलिसांनी सद्या तरी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केल्नी आहे. आज सोमवारी शवचिकित्सा झाल्यानतंरच हनिशाच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. सर्वेशने आपल्या कावरे-पिर्ला गावात आत्महत्या केल्याने, केपे पोलिसांनी आत्महत्या म्हणून नोंद केली आहे.
हनिशाचा खून गावात चर्चा
हनिशा कपडे धुण्यासाठी ओहोळावर गेली होती. यावेळी ओहोळावर अन्य कुणीच नव्हता, ही संधी साधून सर्वेशने हनिशाला ओहळातील पाण्यात बुडवून जीवंत मारले असावे, अशी चर्चा काल रविवारी खेडे-पाडी गावात होती. मात्र, कुंकळळी पोलिसांकडे संपर्क साधला असता, सद्या तरी हनिशाचे मृत्यू प्रकरण हे अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केल्याची माहिती त्यांनी दिली.
हनिशाने यंदा बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. तसेच ती पुढील शिक्षण घेणार होती अशी माहिती तिच्या काकाने दिली. सद्या कोरोना महामारीमुळे महाविद्यालये बंद असल्याने ती पुढील शिक्षणासाठी जाऊ शकली नव्हती. सर्वेश हा घरीच असायचा.
‘अभी बहुत कुछ होने को बाकी है’
सर्वेशने आपल्या मोबाईलवर शनिवारी एक स्टेटस टाकला होता. त्यात एका वैफल्यग्रस्त तरुणाचा व्हिडिओ होता. या व्हिडिओत तो तरुण ‘ये रात इतनी जल्दी खत्म होनेवाली नही सर… अभी बहोत कुछ होने को बाकी है’ अशी डायलॉगबाजी करतो. सर्वेशचा हा स्टेट्सही चर्चेचा विषय बनला आहे. हा स्टेट्स हनिशाला संदेश देण्यासाठी होता का? असा सवालही उपस्थित होत आहे.









