गणाचारी गल्ली जवळील घटना : अग्निशामक दलाच्या जवानांनी काढला मृतदेह बाहेर
प्रतिनिधी / बेळगाव
गणाचारी गल्ली जवळील बकरीमंडई परिसरात असलेल्या विहिरीमध्ये तरुणाने मंगळवारी दुपारी उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नागेश गोपाळ नाईक (वय 25, रा. शाहूनगर, सध्या रा. गणाचारी गल्ली) असे त्या तरुणाचे नाव आहे.
नागेश याला व्यसन होते. त्यातूनच त्याने आपले जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले. नागेश याने विहिरीत उडी घेतल्याचे काही जणांना दिसले. त्यानंतर तातडीने खडेबाजार पोलिसांना याची माहिती देण्यात आली. खडेबाजार पोलिसांनी अग्निशामक दलाला ही माहिती कळविली.
त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ठाणा अधिकारी व्ही. एस. टक्केकर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी दाखल होवून तो मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात तो हलविण्यात आला. खडेबाजार पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.
याबाबत खडेबाजार पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीच माहिती देण्यास नकार दिला. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्न करुन मृतदेह बाहेर काढला. तर केवळ बघ्याची भूमिका खडेबाजार पोलिसांनी घेतली होती.









