डॉल्बीचा दणदणाट-नृत्याची साथ, शहरात रंगोत्सव उत्साहात : बेळगाव
प्रतिनिधी / बेळगाव
रंगांची उधळण करत डिजेच्या दणदणाटात शुक्रवारी रंगोत्सव साजरा करण्यात आला. सर्वत्र तरुणाईचा जल्लोष व उत्साह दिसून आला. डिजेच्या तालावर तरुणाई बेधुंद होत थिरकली. मागील दोन वर्षांमध्ये कोरोना नियमावलीमुळे रंगपंचमी उत्साहावर मर्यादा आल्या होत्या. या दोन वर्षांची राहिलेली कसर यावषी भरून काढण्यात आली. त्यामुळे रंगपंचमी साजरी करण्यासाठी ठिकठिकाणी तुफान गर्दी झाली होती. एकमेकांना रंग लावत ‘बुरा ना मानो, होली है’ असे म्हणत हा आनंद द्विगुणीत करण्यात आला.
होळीच्या दुसऱया दिवशी बेळगाव शहर व उपनगरांमध्ये रंगपंचमी साजरी करण्यात आली. शुक्रवारी सकाळपासूनच रंगपंचमीला सुरुवात झाली. हातात रंगांच्या पिशव्या घेऊन बालचमू एकमेकांना रंग लावत होते. उपनगर तसेच ग्रामीण भागातून युवावर्ग डिजेवर थिरकण्यासाठी शहरात दाखल होत होता.
सकाळी 10 नंतर रंगपंचमीला जल्लोषी वातावरणात सुरुवात झाली. अंगभर रंग लावून शहरात घिरटय़ा घालणाऱया तरुणांची संख्या अधिक होती.
बेळगाव शहरात चव्हाट गल्ली, पांगुळ गल्ली, खडक गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, कंग्राळ गल्ली, गणाचारी गल्ली, शिवाजीनगर, गांधीनगर, शाहूनगर येथे डिजे लावून युवापिढी थिरकत होती. केवळ युवावर्गच नाही तर महिला व बालचमूंची संख्याही अधिक होती. दरवर्षी ऐन रंगपंचमीमध्ये परीक्षा सुरू असायच्या. परंतु यावषी रंगपंचमी लवकर आल्यामुळे परीक्षांचे टेन्शन नसल्याने युवावर्गामध्ये जल्लोष दिसून आला.
शहरासह उपनगरांमध्येही रंगपंचमीचा आनंद
बेळगाव शहरासह उपनगरांमध्येही नागरिकांनी रंगपंचमीचा आनंद घेतला. टिळकवाडी, चन्नम्मानगर, अनगोळ, उद्यमबाग, नेहरूनगर, सदाशिवनगर, शिवबसवनगर, रामतीर्थनगर, महांतेशनगर, गांधीनगर, शाहूनगर या भागातही तरुणाई, महिला, आबालवृद्धांनी रंगपंचमी साजरी केली. ठिकठिकाणी युवक मंडळांनी रेनडान्सचे आयोजन केले होते. दुपारपर्यंत रंगपंचमीसाठी उत्साह दिसून आला.
अश्वत्थामा मंदिरात लोटांगण
पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरात प्राचीन काळापासून होळीच्या निमित्ताने लोटांगण घालण्याची प्रथा आहे. दक्षिण भारतातील एकमेव असणाऱया अश्वत्थामा मंदिरात आपल्या मागण्या पूर्ण होवोत, यासाठी लोटांगण घातले जाते. शुक्रवारी पहाटे 5 वा. पांगुळ गल्ली येथील होळीचे पूजन करण्यात आले. सामुहिक आरती करून होळी दहन करण्यात आली. दुपारी 12.30 वा. मंदिरासमोर लोटांगण घालण्यास सुरुवात झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत हे लोटांगण सुरू होते. केवळ बेळगावच नव्हे तर आसपासच्या परिसरातील भाविकांनीही या ठिकाणी लोटांगण घातले. या कार्यक्रमाला 8 ते 10 हजार नागरिक उपस्थित होते. लोटांगणानंतर मंदिराचे पुजारी आनंद भातकांडे यांनी गाऱ्हाणे घालत सर्वांचे आरोग्य चांगले राहो, अशी मागणी देवाकडे केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पांगुळ गल्ली येथील युवक मंडळाने मेहनत घेतली.
चव्हाट गल्ली येथे पारंपरिक पद्धतीने होळी
चव्हाट गल्ली येथे पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. बुधवारी रात्री गल्लीतील पंचमंडळी व युवकांनी होळी आणण्यासाठी लागणाऱया गाडय़ाची बांधणी केली. गुरुवारी दुपारी पारंपरिक पद्धतीने किल्ला येथून होळी आणण्यात आली. कोणत्याही यंत्रोपकरणांचा आधार न घेता बैलांच्या साहाय्याने होळी गल्लीमध्ये आणण्यात आली. शुक्रवारी ही होळी चव्हाटा मंदिराच्या मागील बाजूला उभी करण्यात आली. ढोर गल्ली येथील कोलकार कुटुंबीयांकडून गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर होळीचे दहन करण्यात आले.
हिडीस प्रकारांना आवर गरजेचा
होळी व रंगपंचमीच्या नावावर काही तरुणांकडून हिडीस प्रकार सुरू असल्याने ज्येष्ठ व्यक्तींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. रंगपंचमीवेळी फाटलेले कपडे विद्युतवाहिन्यांवर टाकले जात होते. या ओल्या कपडय़ांमुळे शॉर्टसर्किट होण्याची शक्मयता असल्याने हेस्कॉमकडून असे कपडे त्वरित हटविले जात होते. त्याचबरोबर रंगपंचमीतील फाटके कपडे होळीमध्ये टाकण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे यापुढे तरी असे प्रकार थांबवावेत, अशी मागणी जाणकार करीत होते.









