ऑनलाईन टीम / मुंबई :
काल झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केला होता. उध्दव ठाकरेंच्या या भाषणावर भाजपने आता जोरदार टीका केली होती. सावरकर सभागृहात भाषण करणारे मुख्यमंत्री सावरकरांबद्दल एकही शब्द का बोलले नाहीत? त्यांना नवीन मित्राची भीती वाटत असेल अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
वीर सावरकर आमचे मार्गदर्शक आहेत. भाजप नेत्यांनी इतिहास चाळून पाहावा असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय. वीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत शिवसेनेची भूमिका कायम आहे. केंद्रात भाजप सरकार असून सावरकरांना अद्याप भारतरत्न का नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, सावरकरांच्या सन्मानासाठी शिवसेना जागरुक आहे. सावरकरांवर ज्यांनी आक्षेपार्ह टीका केली त्यांना आम्ही उत्तर दिले आहे, असे देखील संजय राऊत म्हणाले. सावरकरांनी देशाचे नेतृत्व केले. अंदमानमध्ये तुरुंगवास भोगला. अशा सावरकरांबाबतीत केंद्र सरकार शांत का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.