खाण उद्योजक अंबर तिंबले यांचे मत : झटपट श्रीमंत होणाऱयांकडून खाणक्षेत्र बदनाम
प्रतिनिधी / पणजी
खाण क्षेत्र चालविताना ज्या काही चुका झालेल्या आहेत त्यांचे खापर केवळ खाण कंपन्यांच्या माथी फोडले जातेय. प्रत्यक्षात झटपट श्रीमंतीचा मार्ग चोखाळणाऱया एजंटांनी खाणक्षेत्रात प्रवेश करून खनिजमालाची परस्पर निर्यात करून या क्षेत्राला बदनाम केलेले आहे. असे असले तरी आता नव्याने खाणी सुरू झाल्या पाहिजेत. थोडी सावधनताही बाळगणे आवश्यक आहे. ज्यांचा खाणी सुरू करण्यासाठी दूषित हेतूने आटापिटा असेल तर त्यांनी तो सोडावा व केवळ जनहित हाच हेतू बाळगावा, असे निवेदन प्रसिद्ध खाण उद्योजक व फॉमेंतो रिसोर्सिसचे व्यवस्थापकीय संचालक अंबर तिंबले यांनी केले आहे.
खाणी पुन्हा सुरू होणे आवश्यक
दै. तरुण भारतशी तिंबलो यांनी थेट इंग्लंडहून संपर्क साधला आणि गोव्यात खाणी पुन्हा सुरू होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे राज्यात खाण व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा या उद्देशाने आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत, त्यांना त्याबाबत यश मिळू दे, असेही ते म्हणाले.
आजवर गोवा सर्व क्षेत्रात सुरक्षित
गोव्याला स्वतःचा असा स्वतंत्र दर्जा आहे. आजवर गोवा सर्व क्षेत्रात सुरक्षित आहे. शिक्षण असो, संस्कृती आणि निसर्गाने देखील गोव्याला नेहमीच सुरक्षित ठेवले आहे. गोवा एवढा छोटा असला तरी त्याचे दरडोई उत्पन्न हे देशात सर्वाधिक आहे. राज्यातील एकंदर खाण क्षेत्राने फार मोठी प्रगती केली आहे. येथील सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःचा एक वेगळा दर्जा राखलेला आहे.
खाणबंदीतून गोव्याला मोठा आर्थिक फटका
गेली 8 वर्षे गोव्यातील खाण क्षेत्र बंद पडलेले आहे. त्यातून गोव्याला प्रचंड असा आर्थिक फटका बसलेला आहे. 1960 वा त्यापूर्वीपासून आजवर म्हणजे 2006 पर्यंतचा विचार करा! या खाण क्षेत्राने या राज्याच्या विकासात फार मोठे योगदान दिलेले आहे, असे तिंबले म्हणाले.
खाणक्षेत्र 2006 ते 2012 पर्यंत अडचणीचे का ठरले
एवढी वर्षे खाण क्षेत्राने कोणाला त्रास दिला नाही. मग 2006 पासून 2012 पर्यंतच खाण क्षेत्र फार अडचणीचे का ठरले? याचा विचार करणे आवश्यक आहे. एका रात्रीत झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करणारी एजंट मंडळी काही राजकीय व्यक्तींना हाताशी धरून या व्यवसायात उतरली आणि संपूर्ण क्षेत्रालाच बदनाम करून टाकले. एवढी वर्षे खाण व्यवसाय नीट चालत होता. सुमारे 7 वर्षांमध्ये जे काही झाले त्याचे परिणाम आज आपण गोमंतकीय भोगत आहोत. खाण क्षेत्राचा कोणताही अनुभव नव्हता अशा सुमारे 90 एजंटांनी मोठय़ा प्रमाणात खनिजाची निर्यात केली. काहींनी खाणीतील बरेचशे व्यवहार आपल्या ताब्यात घेतले. या सर्वांचा परिणाम म्हणून गेली 8 वर्षे राज्यातील खाण व्यवसाय बंद आहे, असेही अंबर तिंबले यांनी नमूद केले.
खाण व्यवसाय बंद म्हणजेच राज्याची आर्थिक घसरण
ज्या एनजीओंनी वा शहा आयोगाने खाण कंपन्यांवर दोषारोप केले, त्यांच्यावर बोट ठेवले त्यांना हे एजंट का दिसले नाहीत? कोणी 20 हजार कोटी म्हटले तर कोणी 35 हजार कोटी रुपयांची फसवणूक म्हटलीय. प्रकरण उच्च न्यायालयात गेले. अजून निवाडा यायचा आहे. खाणी बंदच आहेत. त्यामुळे गोव्याला मोठा आर्थिक फटका बस आहे, याचा विचार व्हायला हवो, असे त्यांनी सांगितले.
गोव्य़ावर अशी पाळी येणे योग्य नाही
आज आठ वर्षानंतर खाणी सुरू होत नाहीत. त्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिक असो वा या व्यवसायाच्या निमित्ताने रोजगारीबाबत अवलंबून आहेत, त्यांच्यात साहजिकच त्यांच्यात नैराश्य भावना निर्माण होऊ शकते. ज्या गोव्याने खनिज निर्यातीतून देशाला सार्वजनिक उत्पन्न दिले त्याच गोव्यावर आज ही अशी पाळी येणे बरोबर नाही. आज नव्यातील खाण व्यवसाय सुरू झाला पाहिजे आणि लिलाव पुकारून प्रश्न सुटणार नाहीत. खाणी बंद असताना देखील राज्यातील खाण चालकांना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दामदुप्पटीने स्टँपडय़ुटी भरायला लावलेली आहे.
महामंडळ स्थापल्यास अडचण वाढणार
आज नव्याने खाणी सुरू करण्यापूर्वी काही एनजीओ खाण महामंडळ स्थापनेची मागणी करतात. राज्यातील एकही महामंडळ नफ्यात चालत नाही. काही महामंडळे तर दयनीय अवस्थेत असताना खाणीच्या नावाने आणखी एक महामंडळ स्थापन करून सरकार आपली अडचण वाढवून घेईल, असे आपल्याला वाटत नाही, असे तिंबले म्हणाले.









