ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे आज लोकसभेत कृषी कायदे मागे घेण्याबाबतचे विधेयक मंजूर झाले. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चाचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. लोकसभेत कृषी कायदे मागे घेण्यात आल्याचा आनंद आहेच. पण तरीही आंदोलन मागे घेतले जाणार नाही. देशात आंदोलन होऊच नये, अशी सरकारची इच्छा आहे. पण एमएसपी गॅरंटी कायदा आणि अन्य मुद्यांवर समाधानकारक चर्चा झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असे टिकैत यांनी म्हटले आहे.
राकैश टिकैत म्हणाले, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर केल्याचा आनंद आहे. पण या लढाईत आमचे 700 शेतकरी बांधव शहीद झाले. त्यामुळे आनंदोत्सव साजरा करणार नाही. हे कायदे म्हणजे एकप्रकारचा रोगच होता. तो आता गेला. मात्र, एमएसपी गॅरंटी कायद्यासह अन्य मोठे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याचा सरकारने विचार करावा. शेतकऱयांच्या इतर मागण्यांवरही समाधानकारक चर्चा झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर शेतकरी ठाम आहेत.