ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतरच भारत-पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंध सुधारतील, असे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना इम्रान खान म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेनुसार वाटचाल करतात. त्यामुळे मोदी सरकार जेव्हा सत्तेतून पायउतार होईल, तेव्हाच दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध सुधारतील. भारताचे नेतृत्त्व दुसऱ्या नेत्याकडे असते तर आम्ही राजकीय मतभेदांवर तोडगा काढला असता आणि आज दोन्ही देशातील संबंध चांगले असते.
मला भारताकडून अधिक सन्मान मिळाला आहे, त्यामुळे भारतीय नेत्यांना मी चांगले ओळखतो. मोदी पंतप्रधान झाल्यावर मी त्यांना पहिला फोन केला. पाकमधील गरीबी दूर करण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली. तेव्हा दोन्ही देशातील व्यापारी संबंध चांगले ठेवणे गरजेचे आहे, त्याचा दोन्ही देशांना फायदा होईल असे मोदींनी म्हटले होते.
दरम्यान, इम्रान खान यांनी 2019 साली भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदी भारताचे पंतप्रधान झाले तर काश्मीरप्रश्नी चर्चा पुढे जाऊ शकते, असे विधान केले होते.









