रजनीकांत 31 डिसेंबर रोजी नव्या पक्षाची घोषणा करणार : तामिळनाडूची विधानसभा निवडणूक लढविणार
वृत्तसंस्था/ चेन्नई
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (69 वर्षे) यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच 2021 ची विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचेही जाहीर केले आहे. पक्षासंबंधीची औपचारिक घोषणा 31 डिसेंबर रोजी होणार आहे. आम्ही अथक परिश्रम करू आणि विजयी होऊ असे उद्गार रजनीकांत यांनी काढले आहेत. तामिळनाडूत पुढील वर्षी एप्रिल-मे दरम्यान विधानसभा निवडणूक होणार आहे.
जनतेच्या प्रचंड सहकार्याने निवडणुकीत आमचा पक्ष विजयी होणार असल्याचा विश्वास आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चित अध्यात्मिक राजकारणाचा उदय होईल. एक चमत्कार होईल, असे रजनीकांत यांनी ट्विट करत म्हटले आहे.
रजनीकांत मागील अनेक महिन्यांपासून राजकारणात अप्रत्यक्ष स्वरुपात सक्रीय आहेत, परंतु पहिल्यांदाच त्यांनी राजकीय कारकीर्द संबंधित अधिकृत भूमिका मांडली आहे. पक्षाची निर्मिती आणि विधानसभा निवडणुकीत भाग घेण्याच्या घोषणेनंतर तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका कलाकाराचा प्रवेश होणार आहे. यापूर्वी राज्यात अनेक कलाकारांनी राजकारणात यश मिळविले आहे.
रजनीकांत यांनी मागील वर्षी अभिनेते कमल हासन यांच्या पक्षासोबत आघाडी करण्याचा विचार मांडला होता. राज्याच्या जनतेचे हित पाहता कमल हासन यांच्यासोबत आघाडी करण्याची स्थिती निर्माण झाल्यास परस्परांसोबत येऊ, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्याच्या राजकारणात यशस्वी ठरलेले कलाकार
डॉ. एमजी रामचंद्रन : एमजीआर या नावाने प्रसिद्ध रामचंद्रन तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. सर्वप्रथम त्यांनी अण्णादुराई यांच्या द्रमुकमध्ये प्रवेश केला. अण्णादुराई यांच्या निधनानंतर एम. करुणानिधी यांच्यासोबत मतभेद झाल्याने त्यांनी अण्णाद्रमुक हा नवा पक्ष स्थापन केला होता. 1997-80 आणि 1980-84 या कालावधीत ते दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले.
एम. करुणानिधी : तमिळ चित्रपटसृष्टीतील पटकथालेखक. अनेक प्रसिद्ध चित्रपटांची पटकथा लिहिली, यात एमजीआर यांचेही चित्रपट सामील आहेत. द्रमुकमध्ये प्रवेश करत 5 वेळा मुख्यमंत्रिपद भूषविले.
जे. जयललिता : तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रख्यात नाव. एमजीआरसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अण्णाद्रमुकमध्ये प्रवेश केल्यावर 4 वेळा मुख्यमंत्री राहिल्या.
विजयकांत : अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते. देसीय मुरपोक्कु द्रविड कडगम स्थापन केला. 2011 च्या विधानसभा निवडणुकीत 29 जागा जिंकल्या. स्वतःच्या पक्षाचे महासचिव आणि सध्या आमदार आहेत.
कमल हासन : अभिनेता म्हणून यशस्वी कारकीर्द. चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनही कार्य. हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. 2018 मध्ये मक्कल नीधि मय्यम हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. अद्याप निवडणुकांमध्ये भाग घेतलेला नाही.
सरत कुमार : प्रथम द्रमुक नंतर अण्णाद्रमुकमध्ये प्रवेश. त्यानंतर पुन्हा द्रमुक. पुन्हा अण्णाद्रमुकमध्ये परतले. सध्या कुठलीच मोठी जबाबदारी नाही.
करुनास : विनोदवीर असलेले करुनास हे सध्या अण्णाद्रमुकचे आमदार आहेत.









