मालवणात दिवाळी अन् मेचाही हंगाम गेला पाण्यात : पर्यटक व्यावसायिक मोठय़ा अडचणीत : कोटय़वधींच्या कर्जांमुळे अनेक तरुण आर्थिक विवंचनेत : शासनाचाही महसूल तब्बल 20 लाखांनी घटला
मनोज चव्हाण / मालवण:
दिवाळी आणि मे महिन्यातील सुट्टय़ांचा हंगाम मालवणच्या पर्यटनासाठी महत्वाचे मानले जातात. यावर्षी दिवाळी हंगाम वादळांमुळे पाण्यात गेला. नंतर एप्रिल, मे महिन्यात पर्यटकांची संख्या वाढेल, या आशेवर असलेला व्यावसायिक येथील कोरोनाच्या दणक्याने बेहाल झाला आहे. यावर्षीचा संपूर्ण हंगाम अडचणीचा ठरल्याने कोटय़वधींची कर्जे घेऊन पर्यटन व्यवसायात उतरलेला तरुण, मच्छीमार कुटुंबियांतील युवक मोठय़ा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. पर्यटक हंगामाच्या यावर्षी फक्त 3 लाख 16 हजार पर्यटकांनी एप्रिल 19 ते मार्च 20 या कालावधीत किल्ले सिंधुदुर्गला अधिकृतरित्या नोंद करत भेट दिली आहे.
गतवर्षी सुमारे 4 लाख पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गचे दर्शन घेतले होते. गतवर्षी सर्वाधिक पर्यटकांची नोंद झाली होती. गेल्या नऊ वर्षांतील आकडेवारीनुसार 3 लाख 40 हजार 693 ही 2016-17 मधील पर्यटकांची सर्वाधिक संख्या राहिली आहे. आर्थिक वर्ष आणि सप्टेंबर ते मे या पर्यटन हंगामाची सरासरी पाहिली, तर किल्ल्यास भेट दिलेल्या अधिकृत पर्यटकांची संख्या गतवर्षी 3 लाख 90 हजारपेक्षा जास्त नोंदली होती. अधिकचे दिवस मिळाल्यावर ती चार लाखांत पोहोचली होती.
डिसेंबर, जानेवारीत पर्यटकांची तुफान गर्दी
आतापर्यंतच्या पर्यटन इतिहासातील सर्वाधिक गर्दीचा महिना डिसेंबर 2016 ठरला आहे. या महिन्यात तब्बल 79 हजार 186 पर्यटकांनी सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंतीसाठी गर्दी केली. त्या खालोखाल जानेवारी दुसऱया क्रमांकाचा तुफानी गर्दीचा महिना ठरला. या महिन्यात 67 हजार 808 पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले. मात्र, डिसेंबर 19 मध्ये तब्बल 67 हजार 121 पर्यटकांनी किल्ल्याला भेट दिली. जानेवारी 20 मध्ये 61 हजार 612 पर्यटकांनी किल्ल्याला भेट दिली.
चोरटय़ा वाहतुकीवर नियंत्रण ठेवले म्हणून
गेल्या दोन हंगामात सातत्याने काही व्यावसायिक चोरटी किल्ला प्रवासी वाहतूक करीत असल्याची तक्रार केली जात होती. बंदर विभागाने त्यावर बऱयापैकी आळा घातल्याने शासन दरबारी प्रती पर्यटक मोठे दहा आणि लहान गट पाच रुपयांप्रमाणे बऱयापैकी महसूल जमा झाला आहे. आता बंदर विभागाने आपल्या हद्दीतील पार्किंगकडे लक्ष ठेवून पार्किंग फिही वसूल केल्यास वाढत्या पर्यटनाचा लाभ शासनाला होऊ शकतो. मालवण पालिका बंदर जेटीची साफसफाई करीत असल्याने त्यांनीही कर रुपाने बंदर विभागाने आपल्याला काही रक्कम अदा करावी, असा प्रस्ताव ठेवला आहे. त्याला बंदर विभाग कितपत प्रतिसाद देतो, याकडे लक्ष लागून आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साफसफाईत किल्ला रहिवासी संघ आणि वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीने लक्ष घातल्यामुळे तीन लाखाच्यावर पर्यटक येऊनही कचऱयाची समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवली नाही.
यावर्षी तब्बल दीड लाखाने पर्यटक संख्या घटली
यावर्षी फक्त 3 लाख 16 हजार पर्यटक मालवणात आले. गतवर्षी हा आकडा साडेचार लाख होता. दीड लाखाने पर्यटक संख्या घटली आहे. यात डिसेंबर आणि एप्रिल-मेचा महत्वाचा हंगाम हातून गेला आहे. यामुळे किल्ला होडी सेवा करणाऱया कुटुंबियांवर, पर्यटक व्यावसायिकांवर मोठे संकट उभे राहिले आहे.
सुमारे 45 लाखाचे उत्पन्न
एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत एकूण 3 लाख 16 हजार 275 पर्यटकांची नोंद झाली आहे. किल्ला प्रवासी वाहतुकीतून शासनाला 29 लाख रुपये पर्यटकांकडून कर मिळालेला आहे.
एप्रिल 2019 ते मार्च 2020 अखेर पर्यटकांची नोंद-(पर्यटक संख्या व महिना)
एप्रिल 2019 26,149
मे 68,741
सप्टेंबर 1538
ऑक्टोबर 7816
नोव्हेंबर 26,980
डिसेंबर 67,121
जानेवारी 2020 61,612
फेब्रुवारी 43,422
मार्च 12,896
…………………………………………………………….
एकूण 3,16,275

शासनाने मदतीचे पॅकेज द्यावे-दामोदर तोडणकर
केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजमध्ये पर्यटन व्यावसायिकांना कोणतेही स्थान दिलेले नाही. पर्यटन वाढीसाठी काम करणाऱया व्यक्तींना आधार देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. हजारो तरुण पर्यटन व्यवसायात उतरले आहेत. मात्र, वादळ, पावसाळा आणि कोरोना संकटामुळे पर्यटन हंगाम अडचणीत आला आहे. शासनाने पर्यटन व्यावसायिकांना मदतीचा हात न दिल्यास कर्जबाजारी होऊन तरुण आत्महत्या करतील, अशी भीती स्कुबा व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी व्यक्त केली.









