रेशनबरोबरच शासकीय सुविधांपासून वंचित : तातडीने सुरू करण्याची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या दहा महिन्यांहून अधिक काळ रेशनकार्डचे काम बंद असल्याने सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. नवीन रेशनकार्ड बनविण्यासह इतर रेशनकार्डची सर्वच कामे ठप्प झाल्याने गोरगरीब रेशनपासून वंचित आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर मार्चपासून स्थगित झालेल्या रेशनकार्डच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नाही. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील गरिबांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रेशनकार्डचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
शहरातील अशोकनगर, गोवावेस, रिसालदार गल्ली, टीव्ही सेंटर आदी ठिकाणी असलेल्या बेळगाव वन कार्यालयांतून रेशनकार्डचे काम चालते. मात्र, या ठिकाणी चौकशी केली असता अद्याप रेशनकार्ड सुरू करण्याविषयी प्रशासनाकडून कोणत्याच सूचना देण्यात आल्या नसल्याची माहिती देण्यात आली. रेशनकार्डचे काम बंद असल्याने रेशनबरोबरच नागरिकांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे रेशनकार्डचे काम लांबणीवर पडले होते. मात्र, आता ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली तरी रेशनकार्डच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे.
रेशनकार्डचे काम ठप्प झाल्याने अनेकांना दर महिना मिळणाऱया रेशनपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय रेशनकार्डअभावी नागरिकांची इतर शासकीय कामे रेंगाळली आहेत. रेशनकार्डच्या कामासाठी सर्वसामान्य नागरिक बेळगाव वन कार्यालयाच्या पायऱया झिजवत असले तरी रेशनकार्डचे काम ठप्पच आहे.









