देश सध्या ‘कोरोना’ नामक अनपेक्षित संकटाशी प्राणपणाने झुंजत आहे. कोरोनाच्या रुग्णांचा आणि बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशा स्थितीत सर्व नागरिकांनी आपला धर्म, जात, पंथ, वंश आणि राजकारण दूर सारून सरकार आणि प्रशासनाला मनापासून सहकार्य करणे आवश्यक आहे. तथापि, दुर्दैवाने आपल्या देशात अशा काही शक्ती आहेत, ज्या सरकारने केलेले नियम धाब्यावर बसविण्यात, तसेच आपल्या अंधश्रद्धांचा प्रसार करण्यात धन्यता मानतात. मुस्लीम समाजाचा भाग असलेली ‘तबलीग जमात’ ही अशी एक संस्था आहे. या संस्थेने जमावबंदीचा आदेश धुडकावून दिल्लीत केलेला ‘मर्कझ’ हा कार्यक्रम हा याच बेजबाबदारपणाचे आणि धार्मिक गुर्मीचे ज्वलंत उदाहरण बनला आहे. देशात कोरोनाची साथ हळूहळू हातपाय पसरत असताना आणि ही साथ किती धोकादायक आहे, याची पूर्ण माहिती असतानाही या संस्थेने हजारो लोकांना एकत्र करून केवळ नियमभंग केला आहे असे नव्हे, तर गुन्हा केला आहे. 1 मार्च ते जवळजवळ 28 मार्च या कालावधीत झालेल्या या कार्यक्रमाला भारतातील प्रत्येक राज्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते. उपस्थितांची नेमकी संख्या किती, याची पूर्ण माहिती अद्याप उपलब्ध नाही. तथापि, ती किमान 3000 ते जास्तीत जास्त 10 हजारपर्यंत असू शकते असे अंदाज व्यक्त होत आहेत. या उपस्थितांमध्ये 500 हून अधिक विदेशी नागरिकांचा आणि विदेशी मुस्लीम धर्मगुरुंचाही समावेश होता. या उपस्थितांपैकी अनेकजण कोरोनाग्रस्त होते असे आता उघड होत आहे. या कोरोनाग्रस्त लोकांच्या निकटच्या संपर्कात आल्याने अन्य उपस्थितांपैकी अनेकांना या विषाणूची बाधा झाल्याची शक्यता निश्चितपणे आहे. कार्यक्रमानंतर हे सर्व लोक त्यांच्या गावी परत गेले. त्यापैकी अनेकांनी या कार्यक्रमात झालेली कोरोनाची लागण त्यांच्याबरोबर त्यांच्या गावात नेली. तेथे हे लोक अनेकांच्या संपर्कात आले. त्यामुळे कोरोनाच्या साथीच्या प्रसाराची ‘साखळी प्रक्रिया’ देशात सर्वत्र सुरू झाली. त्यामुळे गेल्या आठवडय़ात देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. त्यामुळे सात दिवसांच्या लॉकडाऊनमुळे साथ रोखण्यात मिळालेले अंशतः यशही धुळीला मिळाले आहे. आता या कार्यक्रमाला कोणकोण गेले होते? त्यांच्यापैकी कोणाकोणाला कोरोनाची लागण झाली आहे? ते कोणकोणत्या गावात गेले? जाताना त्यांनी कोणत्या मार्गांनी प्रवास केला? प्रवासात आणि गावात आल्यानंतर त्यांचा कोणाकोणाशी संपर्क आला? या संपर्कसाखळीमुळे कोणाकोणाला कोरोनाची बाधा झाली आहे अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रशासनाला रक्ताचे पाणी करावे लागत आहे. सध्याच्या अवघड परिस्थितीत प्रशासनावर हा अतिरिक्त दबाव पडला आहे. याला पूर्णतः ही संस्थाच जबाबदार आहे. कोरोनाची साथ तिच्या दुसऱया टप्प्यातच रोखण्याच्या भारताने एकजुटीने चाललेल्या प्रयत्नांवर धार्मिक अंधश्रद्धांचे विरजण पाडण्याचे अत्यंत घृणित कृत्य करण्यात या संस्थेचा मोठा सहभाग आहे, असे म्हणता येते. देशातील हजारो निरपराधी लोकांचे जीव धोक्यात आणून या संस्थेने इस्लामची कोणती सेवा केली याचा खुलासा याच संस्थेने केला पाहिजे. सदर कार्यक्रमात या संस्थेचा प्रमुख मौलाना मोहम्मद साद याचे जे भाषण झाले त्याची ध्वनिफित उपलब्ध असून प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. त्या भाषणात त्याने जे तारे तोडले आहेत, त्यातून त्याची मानसिकता स्पष्ट होते. ‘कोरोना हे मुस्लीमांना एकमेकांपासून अलग करण्याचे कारस्थान आहे. मुस्लीमांनी जमावबंदी, लॉकडाऊन असे सरकारी नियम न पाळता मशिदीत एकत्र जमून नमाज पढलाच पाहिजे. कोरोना झाला तरी हरकत नाही. मृत्यू यायचाच असेल तर त्यासाठी मशिदीसारखी चांगली जागा नाही. कोरोनापासून आपले संरक्षण अल्ला करेल. त्यामुळे कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही’ अशा तऱहेची विधाने करून त्याने मुस्लीमांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक देशातील अनेक मुस्लीम धर्मगुरुनी मशिदी बंद करण्याची आणि घरातूनच नमाज पढण्याची सूचना मुस्लीमांना केली आहे. तिचाही अनादर साद याने केला. इस्लाम धर्माचे उगमस्थान असणाऱया सौदी अरेबियातील मक्का शहरात असणारे जगभरातील मुस्लीमांचे सर्वात पवित्र श्रद्धास्थान ‘काबा’ही बंद करण्यात आले आहे. यंदा तेथे हजयात्रेला येऊ नका, असे आवाहन सौदी सरकारने सर्व मुस्लीमांना केले आहे. यातूनही तबलीग जमात संस्थेने काही धडा घेतला नाही. हे केवळ अज्ञानापोटी झाले असे मुळीच म्हणता येणार नाही. हा जाणूनबुजून केलेला प्रकार आहे, असेच दिसून येते. सध्या साद हा बेपत्ता आहे. आपल्या विरोधात वातावरण तापत आहे, हे लक्षात येताच त्याने आता सूर बदलून सरकारी नियमांचे पालन करा, अशी नवी ध्वनिफित प्रसिद्ध केली आहे. पण तो केवळ कातडी बचावण्याचा प्रयत्न आहे. त्याच्याविरोधात आता गुन्हा नोंद करण्यात आला असून कायद्याच्या कचाटय़ातून सुटका करून घेण्यासाठी हे प्रयत्न चाललेले दिसतात. काही स्वयंभू आणि स्वयंघोषित विचारवंत तसेच काही धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱया राजकीय पक्षांचे नेते तबलीगला निर्दोषी ठरविण्याचा (नेहमीच्या) प्रयत्नात असल्याचेही दिसते. भारत सरकारने इतक्या लोकांना जमू कसे दिले, पोलीस काय करत होते, दिल्लीच्या राज्य सरकारची काही जबाबदारी आहे की नाही, असे नेहमीचेच मुद्दे उपस्थित करून तबलीगच्या गुन्हेगारी कृत्यांवर पांघरूण घालण्याचे प्रयत्न होत आहे. तथापि, जर केंद्र सरकारने किंवा दिल्ली पोलिसांनी हा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला असता, तर याच विचारवंतांनी आणि राजकीय नेत्यांनी केंद्र सरकारवर अल्पसंख्याकांची गळचेपी केल्याचा, घटना पायदळी तुडविल्याचा, हिंदू धर्मवादाचा इत्यादी ठेवणीतले आरोप करून अपप्रचाराची राळ उडवून दिली असती. आता हेच लोक शहाजोगपणे सरकारलाच जाब विचारण्यात आघाडीवर आहेत. कारण त्यांना दोन्ही बाजूंनी बोलण्याची सोय उपलब्ध आहे. तथापि, लक्षात घ्यायची बाब अशी की हा कार्यक्रम या संस्थेने सध्याच्या परिस्थितीत करायलाच नको होता.
Previous Articleआजचे भविष्य शुक्रवार दि. 3 एप्रिल 2020
Next Article चुकीच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्यास काळजी नको!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








