वृत्तसंस्था / रियाध
सौदी अरेबियाने सुन्नी मुस्लिमांची सर्वात मोठी संघटना तबलिगी जमातवर बंदी घातली आहे. सौदी सरकारने या संघटनेला दहशतवादाच्या प्रवेशद्वारांपैकी एक आणि समाजासाठी धोकादायक ठरविले आहे. सौदी अरेबियाच्या या बंदीमुळे तबलिगी जमातवर मोठा प्रतिकूल प्रभाव पडण्याची शक्यता आहे. भारतात कोरोना महामारी च्या प्रारंभी दिल्लीत तबलिगी जमातच्या आयोजनामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
सौदी अरेबियातील इस्लामिक विषयक मंत्र्याने सोशल मीडियावर सुन्नी इस्लामिक संघटनेला दहशतवादाच्या प्रवेशद्वारांपैकी एक ठरवत बंदीची घोषणा केली आहे. मशिदी आणि मौलवींना तबलिगी जमातशी संबंधित लोकांशी संपर्क न ठेवण्याचा निर्देश इस्लामिक विषयक मंत्री डॉ. अब्दुल लतीफ अल अलशेख यांनी दिला आहे. या संघटनेमुळे लोकांची दिशाभूल आणि ब्रेन वॉश होण्याचा धोका असल्याचेही म्हटले गेले आहे.
मशिदींमधून तबलिगी जमातवर बंदी घालण्यात आल्याची कल्पना लोकांना देण्यात यावी असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. सौदी सरकारने याप्रकरणी अत्यंत गंभीर भूमिका घेतली आहे. तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमांच्या आड दहशतवादाला बळ पुरवत असल्याचे सौदी सरकारचे मानणे आहे.
सौदी मंत्रालयाचा मौलवींना निर्देश..
संघटनेच्या सर्वात प्रमुख चुकांचा उल्लेख करा
ही संघटना समाजासाठी धोकादायक असल्याचे लोकांना सांगा
तबलिगीसह सर्व पक्षपातपूर्ण समुहांशी संबंध बाळगणे बेकायदेशीर
तबलिगी जमात म्हणजे काय?
तबलिगी जमातची सुरुवात सुमारे 100 वर्षांपूर्वी देवबंदी इस्लामी विद्वान मौलाना मोहम्मद इलयास कांधलवी यांनी एक धार्मिक सुधारणा आंदोलनाच्या स्वरुपात केली होती. तबलिगी जमातचे काम इस्लाम मानणाऱयांना धार्मिक उपदेश देणे असते. जगभरात एक प्रभावशाली संघटना म्हणून प्रख्यात जमातचे काम आता पाकिस्तान आणि बांगलादेशातून होणाऱया गटबाजीची शिकार ठरले आहे. जगभरात या संघटनेचे 40 कोटी सदस्य असल्याचे मानले जाते. प्यू रिसर्च सेंटरनुसार तबलिगी जमात पश्चिम युरोप, आफ्रिका आणि दक्षिण आशियासह जगभरातील सुमारे 150 देशांमध्ये सक्रिय आहे. दक्षिण आशियात या संघटनेचे अस्तित्व अधिक आहे. विशेषकरून इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश, पाकिस्तान आणि थायलंडमध्ये ही संघटना सक्रिय आहे.









