वार्ताहर/कारदगा
प्रथमाचार्य चारित्र चक्रवर्ती 108 श्री शांतीसागर महाराजांची जन्मभूमी भोज नगरीत त्यांची भव्य दिव्य अशी तपोभूमी निर्माण केली आहे. ही तपोभूमी माझ्या हातून पूर्ण होणे हे मी माझे भाग्य समजतो. हा शांतीसागर महाराजांचा आशीर्वादच समजतो, असे मत तपोभूमी प्रणेते, व्याख्यान वाचस्पती 108 श्री प्रज्ञासागर महाराज यांनी व्यक्त केले. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तपोभूमिनिमित्य दि. 2 ते 9 डिसेंबर अखेर होणाऱया आदर्श पंचकल्याण महामहोत्सव सोहळय़ाविषयी पत्रकारांशी ते बोलत होते.
प्रज्ञासागर महाराज पुढे म्हणाले, प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांच्यामुळे भोज गावचे नाव संपूर्ण देशभर दुमदुमत आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मगावी भोज नगरीला भेट देण्यासाठी दूरचे श्रावक-श्राविका येत असतात. त्यामुळे भोज नगरीत शांतीसागर महाराजांची भव्य अशी तपोभूमी व्हावी, असे मला वाटले. आणि भव्य अशी तपोभूमी निर्माण केली असून या तपोभूमीत मानस्तंभ, 20 तिर्थंकरांच्या मूर्ती, भव्य असे यात्रीनिवास, शांतीसागर महाराजांची आकर्षक अशी मूर्ती, सुंदर असा बगीचा निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे भोज गावच्या वैभवात एकप्रकारे भरच पडली आहे. आज ही तपोभूमी पूर्ण झाली. 2 ते 9 डिसेंबर अखेर पंचकल्याण महामहोत्सव होत आहे. हे माझे भाग्य व भोजवासियांची पुण्याई आहे, असे म्हणावे लागेल.
सध्या कोरोनाचे संकट पुढे उभे आहे. पण आज हा महोत्सव आम्ही करत आहोत. या महामहोत्सव काळात सोशल डिस्टन्सिंग पाळून मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक केले आहे. तर या पूजा महोत्सवासाठी आवश्यक कमिटी नेमण्यात आली असून कमिटीतील सदस्य आपापल्या परीने कार्यरत राहून परिश्रम घेत आहेत. सर्व श्रावक-श्राविकांनी या नियमांचे पालन करावे, असे सांगून महोत्सव काळात दररोज सर्व कार्यक्रम वेळेत व विधीप्रकारे होणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रशांत पाटील, आदगोंड पाटील, विद्याधर नेजे, आप्पासो पाटील, शीतल बागे, रविकिर्ती पाटील, रजनीकांत चौगुले, रमित सदलगे, महावीर टारे, शीतल मुराबट्टे, सचिन केस्ते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.









