सरकारी डॉक्टरांच्या आंदोलनाचे परिणाम : बुधवारी जिल्हय़ात आणखी 258 जणांना कोरोनाची लागण
प्रतिनिधी/ बेळगाव
आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारी डॉक्टरांनी आंदोलन छेडले आहे. त्यामुळे दुसऱया दिवशीही कोरोनाबाधितासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध झाला नाही. मात्र आरोग्य विभागाने तपासणी सुरूच ठेवली आहे.
जिल्हा पातळीवर होणाऱया स्वॅब तपासणीचा अहवाल आरोग्य विभाग तयार करतो. एकंदर किती जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, त्यामध्ये बाधितांची संख्या किती?, अहवाल निगेटिव्ह आलेल्यांची संख्या किती? याचा तपाशील घेऊन हेल्थ बुलेटिनच्या माध्यमातून त्याची माहिती दिली जाते.
राज्य पातळीवरही हे काम चालते. मात्र सरकारी डॉक्टर व आरोग्य अधिकाऱयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे स्वॅब तपासणीचे काम सुरू असले तरी अहवाल तयार करण्यात आला नाही. तपासणी व उपचार ही दोन्ही कामे सध्या सुरू आहेत. दि. 21 सप्टेंबरनंतर ती ही बंद करण्यात येतील, असे सरकारी डॉक्टरांनी सांगितले.
मंगळवारीही आंदोलन सुरू असले तरी राज्य आरोग्य विभागाने रात्री एक हेल्थ बुलेटिन जारी केली होती. यापूर्वी प्रलंबित असलेले सर्व अहवाल या बुलेटिनमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. आता ग्रामीण भागात व तालुका केंद्रावर होणारी स्वॅब तपासणीही बंद झाली आहे. ज्यांना लक्षणे दिसून येतात, जे स्वतःहून स्वॅब तपासणी केंद्राला येतात, अशांचीच स्वॅब तपासणी केली जात आहे.
आतापर्यंत 14 हजार 90 हून अधिक रुग्ण बरे
बुधवारी रात्री राज्य आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार बेळगाव जिल्हय़ात आणखी 258 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण बाधितांच्या संख्येने 17 हजारांचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत 14 हजार 90 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 2708 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील बाधितांचा आकडा मात्र बुधवारी 9 हजार 725 इतका झाला आहे.









