पोलीस वाहनाची तोडफोड
प्रतिनिधी / दिघी,पुणे
चेक पोस्टवर कार थांबवून चौकशी करत असताना कारचालकाने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केल्याचा प्रकार रविवारी (दि.१०) रात्री सव्वानऊ वाजता बोपखेल फाटा, गणेशनगर येथे घडला.महेंद्र रवींद्र वाघमारे (वय ४५, रा. रामनगर, बोपखेल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संजय व्यंकटेश कामठे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार केल्या आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन सर्व प्रकारे खबरदारी घेत आहे. फिर्यादी पोलीस हवालदार कामठे हे बोपखेल फाटा चेक नाक्यावर रविवारी कार्यरत होते. रस्त्याने जाणाऱ्या सर्व वाहनांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.आरोपी त्याच्या कारमधून जात असताना कामठे यांनी आरोपीची कार चेक पोस्टवर थांबवली. कार थांबवल्याचा राग आल्याने आरोपीने पोलीस कर्मचारी कामठे यांच्या कानशिलात लगावली. काहीही करण नसताना कामठे आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल उमेश जाधव यांच्याशी आरोपीने भांडण केले. पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांना दगड फेकून मारला.आरोपीने पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली.पोलीस करत असलेल्या सरकारी कामात आरोपीने अडथळा निर्माण केला. त्यामुळे दिघी पोलीस आरोपीला त्यांच्या व्हॅनमधून दिघी पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आरोपीने वाहनाच्या खिडकीच्या काचेवर डोक्याने धडक मारून काच फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.पोलिसांनी आरोपी वाघमारे याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत भारतीय दंड विधान कलम 353 तसेच 332, 504, 188, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चे कलम 51 (ब), महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 चे कलम 11 तसेच सरकारी मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.









