वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानच्या राष्ट्रीय कनिष्ठ निवड समितीचा प्रमुख सोहेल तन्वीरला अमेरिकेत सुरू असलेल्या टी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्याचा पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा (पीसीबी) निर्णय सध्या वादात सापडला आहे. हा निर्णय हितसंबंधांना छेद देणारा असल्याचे मत व्यक्त करून या निर्णयावरून ‘पीसीबी’वर तीव्र टीका झाली आहे. आयसीसीच्या 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी पाकिस्तानचा युवा संघ जाहीर केल्यानंतर तन्वीर अमेरिकन प्रीमियर लीगमध्ये खेळायला गेला आहे.
पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तन्वीरची राष्ट्रीय कनिष्ठ निवड समितीवर नियुक्ती झाली तेव्हा त्याला लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली होती. पाकिस्तानमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ निवड समितीचे प्रमुख आणि सदस्य या पदांवर होणाऱ्या नियुक्त्या या पगारी असतात. तन्वीर टेक्सासच्या पियरलँड येथील मूसा स्टेडियमवर ‘एपीएल’मध्ये ‘प्रीमियम पाक’साठी खेळत आहे आणि या लीगला अद्याप अमेरिकी क्रिकेट मंडळाकडून मान्यता मिळणे बाकी आहे.
प्रीमियम कॅनेडियन्सविऊद्धच्या नुकत्याच झालेल्या सामन्यात तन्वीरने 31 धावा केल्या आणि फक्त 15 धावा देत दोन बळी घेतले. या प्रकारामुळे वरिष्ठ निवड समितीचा प्रमुख वहाब रियाझ देखील प्रकाशझोतात आला आहे. कारण तो पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार आहे.
हा सारा प्रकार महम्मद हाफिजने जी भूमिका घेतली त्याच्या अगदी उलट आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही हाफिज विविध टी-20 लीगमध्ये खेळत होता आणि पाकिस्तान संघाचा संचालक झाल्यानंतर त्याने आपण फक्त आपल्या या जबाबदारीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे जाहीर केले होते. रंजक भाग म्हणजे काही काळापूर्वी पीसीबीने इंझमाम उल हकला हितसंबंधांच्या विवादामुळे निवड समिती प्रमुखपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते.









