दोहा / वृत्तसंस्था :
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या स्थितीदरम्यना कतारचे राजे शेख तमीत बिन हमाद अल थानी हे तेहरान येथे जाणार आहेत. कतार हा अमेरिकेचा सहकारी देश आहे तसेच त्याच्या क्षेत्रात अमेरिकेचा मोठा सैन्यतळ आहे. कतारसोबत इराणचे संबंधही अत्यंत घनिष्ठ आहेत.
इराण आणि कतारचे संयुक्त नैसर्गिक साठे आहेत. शेख तमीम हे इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांच्यासह सर्वोच्च नेत्यांना भेटणार आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नासाठी ते तेहरान येथे जात असल्याचे मानले जात आहे.
कतारचे विदेशमंत्री महमूद बिन अब्दुर्ररहमान अल थानी यांनी दोन्ही देशांदरम्यान शांततापूर्ण तोडगा काढण्याचा पुढाकार घेतला होता. 3 जानेवारीपूर्वी ते इराणच्या दौऱयावर होते आणि त्यांनी अमेरिकेसोबतचा तणाव कमी करण्याचा सल्ला दिला होता. कतारच्या राजांच्या इराण दौऱयाची पुष्टी मिळाली आहे. शेख तमीम हे सध्या ओमानच्या राज्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ओमानला रवाना झाले आहेत.
इराणसोबत कतारच्या वाढत्या जवळीकीमुळे सुन्नीबहुल देशांसोबतच्या त्याच्या संबंधांमध्ये कटुता आली आहे. याच कारणामुळे त्याच्या अनेक सहकाऱयांनी स्वतःचे करार मागे घेतले आहेत. यात सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त आणि बहारीनचा समावेश आहे.
पाक विदेश मंत्र्यांचा इराण दौरा
पाकिस्तानचे विदेशमंत्री महमूद कुरैशी हे देखील सौदी अरेबिया आणि इराणच्या दौऱयावर आहेत. पाकिस्तान कुठल्याही क्षेत्रीय संघर्षात सामील होणार नाही, शांतता निर्माण करणाऱयाची भूमिका बजावणार असल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. कुणाच्याही विरोधात स्वतःच्या भूमीचा वापर करू देणार नसल्याचेही इम्रान म्हणाले. पाकिस्तानची सीमा इराणला लागून आहे.









