भारत-चीन संवाद : लडाख सीमेवर लेफ्टनंट जनरल स्तरावर चर्चा सुरू, फलनिष्पत्ती गुलदस्त्यात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भारत चीनमध्ये सीमावादावर शनिवारी एक महत्वाची बैठक पार पडली. दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर स्तरावरील अधिकाऱयांमधील चर्चेला प्रारंभ झाला असला तरी अंतिम तोडग्यापर्यंत धडक पोहोचलेली दिसत नाही. अजूनही ही चर्चा सुरू राहणार असून वाढलेला तणाव निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. लडाखच्या सीमेवर दोन्ही बाजूंमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावर ही चर्चा झाली.
भारत आणि चीनमध्ये लष्करी प्रोटोकॉलनुसार फील्ड स्तरावरची सर्वोच्च बैठक शनिवारी पार पडली. गेल्या महिनाभरापासून चीन सीमेवर वाढलेल्या तणावाचा मुद्दा चर्चेतून मिटवण्याचा प्रयत्न दोन्ही देशांकडून झाला. भारताकडून लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी या बैठकीत सहभाग घेतला. या चर्चेच्या माध्यमातून चीनच्या आक्रमक लष्करी हालचाली आणि या हालचालींना भारताने दिलेले प्रत्युत्तर यामुळे लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शुक्रवारी भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱयांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. त्यानंतर शनिवारी भारत आणि चीनच्या लेफ्टनंट जनरल दर्जाच्या लष्करी अधिकाऱयांनी चर्चा केली. किमान दोन्ही देशांमध्ये चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होतोय ही बाब यातून अधोरेखित झाली आहे. गेल्या 32 दिवसांपासून सुरु असलेल्या सीमावादावर काय तोडगा निघतो याकडे दोन्ही देशातील नागरिकांचे लक्ष आहे.
सध्याच तर्कवितर्क नको : लष्कर
भारत आणि चीन यांच्यात थेट चर्चा सुरू झाली असून ही प्रक्रिया यापुढेही सुरू राहील. चर्चा सुरू असताना कोणतेही तर्कवितर्क करणे योग्य होणार नाही, असे वक्तव्य भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने अधिकृतरित्या केले. ठरल्याप्रमाणे सकाळी 9 वाजता लडाखमधील चुशुल येथे संवादाला प्रारंभ झाला. भारताकडून चौदाव्या कोअरचे जनरल ऑफिसर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी चर्चेत सहभाग घेतल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.
पूर्वग्रह बाजूला सारून संवाद सुरू
याआधी शुक्रवारी भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱयांनी केलेल्या चर्चेत दोन्ही देशांचा भावनांचा आदर केला पाहिजे यावर एकमत झाले. परस्पर सामंजस्यातून आणि शांततेने चर्चा करुन तणावावर तोडगा काढला पाहिजे यावरही अधिकाऱयांचे एकमत झाले. चर्चेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी चर्चा पूर्वग्रह बाजूला सारुन मोकळय़ा वातावरणात पार पडणे अपेक्षित आहे अशी भावना दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱयांनी व्यक्त केली.
मेजर जनरल दर्जाच्या चर्चेच्या फेऱया अपयशी
तणाव दूर करण्यासाठी आधी भारत आणि चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ कार्यरत कमांडरच्या स्तरावर चर्चेचे प्रयत्न झाले. तब्बल बारा वेळा चर्चा झाली. नंतर मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱयांमध्ये 3 वेळा चर्चा झाली. या चर्चेत तोडगा निघाला नाही, अखेर दोन्ही देशांनी लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱयांच्या पातळीवर चर्चेचा निर्णय घेतला. आता या चर्चेच्या फलनिष्पत्तीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
चीनच्या हालचालींनंतर वाढला तणाव
गेल्या दोन-तीन महिन्यात लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे चीनच्या हद्दीत चिनी सैन्याच्या लष्करी हालचाली वाढल्या. चीनने पँगाँग लेक येथील गस्ती नौकांची संख्या वाढवली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पीपल्स लिबरेशन आर्मीचे पाच हजार सैनिक आणि तोफा दाखल झाल्या. चिनी लढाऊ विमानांनी चीनच्या हद्दीत पण भारतीय जवानांना दिसेल अशाप्रकारे घिरटय़ा घातल्या. भारतानेही लडाखमध्ये 10 हजार सैनिकांची कुमक तैनात केली. तसेच लडाखमधील सैन्याला आवश्यक साहित्याचा पुरवठा केला. तसेच रस्तेनिर्मितीची कामेही हाती घेतली. अशा विविध हालचालींमुळे लडाखमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले होते.
लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग करताहेत भारताचे नेतृत्त्व…
चीनसोबतच्या चर्चेवेळी भारताचे प्रतिनिधित्व लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग हे करत आहेत. त्यांनी यापूर्वी लष्करी गुप्तचर यंत्रणेचे महासंचालक (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री इंटेलिजन्स), लष्करी कारवायांचे महासंचालक (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स) अशा महत्त्वाच्या जबाबदाऱया सांभाळल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत अधिकारी म्हणून त्यांनी दक्षिण आफ्रिकेत काम केले आहे. सध्या हरिंदर सिंग चौदाव्या कोअरचे जनरल ऑफिसर असून ‘फायर एंड फ्युरी कॉर्प्स’ म्हणजे भेदक आणि वेदनादायी हल्ल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जवानांचे ते नेतृत्व करतात. त्यांची कमांड जम्मू काश्मीरमधील उधमपूरमध्ये असलेल्या उत्तरेतील कमांडच्या अखत्यारित येते. त्यांची तुकडी अतिशय प्रतिकूल वातावरणातून अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी ओळखली जाते. जिथे जास्त धोका, मोठी आव्हाने असतात आणि वेगाने कारवाई करायची असते अशा ठिकाणी अनेकदा हरिंदर सिंह यांच्याकडे जबाबदारी देण्यात येते. यापूर्वीही त्यांनी बऱयाचदा जोखमीची कामे सहज पार पाडली आहेत.









