वृत्तसंस्था/ पतियाळा
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी सहभागी होणारा भारताचा ऍथलीट तजिंदर पाल सिंग तूरने येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य ऍथलेटिक्स स्पर्धेच्या चौथ्या दिवशी पुरूषांच्या गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकाविले.
तजिंदर पाल सिंगने पुरूषांच्या गोळाफेकमध्ये 21.49 मी.चे अंतर नोंदवित सुवर्णपदक पटकाविले. तजिंदर पाल सिंगचा या क्रीडाप्रकारातील हा नवा राष्ट्रीय विक्रम आहे. पंजाबच्या तजिंदर पाल सिंगने गेल्या आठवडाभराच्या कालावधीत दोनवेळा गोळाफेकमध्ये 21 मी.पेक्षा अधिक अंतर नोंदविले. या क्रीडा प्रकारात पंजाबच्या करणवीर सिंगने 19.33 मी.चे अंतर नोंदवित रौप्य आणि राजस्थानच्या शर्माने 18.33 मी. चे अंतर नोंदवित कास्यपदक घेतले.
महिलांच्या भालाफेक प्रकारात उत्तर प्रदेशच्या अनु राणीने 62.83 मी. चे अंतर नोंदवित सुवर्णपदक मिळविले पण तिला ऑलिंपिक पात्रतेची मर्यादा ओलांडण्यात अपयश आले. 2019 च्या आशियाई स्पर्धेत अनु राणीने भालाफेकमध्ये कास्यपदक मिळविले होते. राजस्थानच्या संजना चौधरीने 52.65 मी. चे अंतर नोंदवित रौप्य, हरियाणाच्या पुष्पा जाखरने 52.48 मी. चे अंतर नोंदवित कास्यपदक मिळविले. महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत कर्नाटकाच्या प्रिया हब्बथनहलीने सुवर्णपदक मिळविताना 53.29 सेकंदाचा अवधी नोंदविला. कर्नाटकाच्या एम.आर. पुवम्माने रौप्य तसेच तामिळनाडूंच्या रेवतीने कास्यपदक मिळविले. महिलांच्या 10 हजार मी. धावण्यांच्या शर्यतीत राजस्थानच्या पुजा हरिजनने 35 मिनिटे, 29.59 सेकंदाचा अवधी घेत सुवर्ण, उत्तर प्रदेशच्या फुलन पालने रौप्य आणि उत्तर प्रदेशच्या ज्योतीने कास्यपदक मिळविले.
पुरूषांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत लंकेच्या कलिंगा कुमारगेने 45.73 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक, पुरूषांच्या 1500 मी. धावण्यांच्या शर्यतीत उत्तर प्रदेशच्या अजयकुमार सरोजने सुवर्णपदक पटकाविताना 3 मिनिटे, 42.55 सेकंदाचा अवधी नोंदविला. केरळच्या मोहम्मद अनीसने पुरूषांच्या लांब उडीत सुवर्णपदक मिळताना 7.76 मी. नोंद केली.









