लग्नानंतर बहुसंख्य महिला घर, कुटुंब, नोकरी या चौकटीतच अडकतात. कौटुंबिक जबाबदार्यांमुळे त्यांना इच्छा असूनही वेगळी वाट धरता येत नाही. मात्र काही महिला ही चौकट मोडून यश मिळवतात. फिटनेस ट्रेनर किरण देंबला याही अशाच महत्त्वाकांक्षी महिलांपैकी एक…
महत्त्वाकांक्षेसोबतच अंगी जिद्द असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. माणसात प्रवाहाविरुद्ध पोहण्याची धमक असायला हवी. जग काय म्हणेल असा विचार करत बसल्यास यशाचं शिखर गाठता येत नाही. मात्र मेहनत आणि इच्छाशक्तीच्या बळावर माणूस जग जिंकू शकतो. अशी काही उदाहरणं आपल्या आसपास आहेत. हैदराबादच्या किरण देंबला यांनीही आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरेच कष्ट घेतले. प्रसंगी दागिने विकले. पण कधीही हार मानली नाही. किरण लग्नानंतर आग्रा येथून हैदराबादला आल्या. सुरूवातीला त्यांचं आयुष्यही सर्वसामान्य गृहिणीप्रमाणेच सुरू होतं. मधल्या काळात त्या गाण्याचे क्लास घेऊ लागल्या. आजारपणामुळे त्यांचं वजन जवळपास 25 किलो वाढलं. त्या बेढब दिसू लागल्या. आपल्या तंदुरुस्तीबाबत सजग असणार्या किरण जीममध्ये जाऊ लागल्या. त्यांनी आहारात बदल केले. या सगळ्याचं फळ त्यांना मिळालं. सात महिन्यांमध्ये त्यांनी 24 किलो वजन कमी केलं. दरम्यानच्या काळात मुलांना शाळेत सोडण्यापासून घराची जबाबदारीही सांभाळली. त्यानंतर त्यांनी फिटनेस ट्रेनरचं प्रशिक्षण घेतलं.
आता आपण काहीतरी वेगळं करायला हवं याची जाणीव त्यांना झाली. स्वतःचं जीम सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. पतीला याबद्दल सांगितलं. भांडवल जमवण्यासाठी दागिने विकले. कर्ज घेतलं आणि जीम सुरू केलं. किरण यांना तिशीपर्यंत बॉडीबिल्डिंगची काहीच माहिती नव्हती. पण जीम सुरू केल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती मिळवली आणि आपणही शरीरसौष्ठवासाठी काहीतरी करावं असं त्यांच्या मनात आलं. त्यांनी प्रयत्नपूर्वक या स्पर्धेसाठी तयारी केली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्या बुडापेस्टला गेल्या. किरण यांनी या स्पर्धेत सहावं स्थान पटकावलं. शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी व्हायला त्यांच्या पतीचा विरोध होता. मात्र किरण यांनी त्यांना समजावलं आणि स्पर्धेत यशही मिळवलं. यामुळे त्यांच्या पतीचा रागही गेला.
किरण आता सेलिब्रिटी ट्रेनर बनल्या आहेत. तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी, दिग्दर्शक राजामौली यांना त्या फिटनेस टिप्स देतात. किरण हैदराबादमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. फिटनेसच्या क्षेत्रात त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं आहे. वयाच्या 45 व्या वर्षी किरण यांनी हे यश मिळवलं आहे. आज किरण फिटनेस ट्रेनर तर आहेतच शिवाय गिर्यारोहक आणि डीजेही आहेत. त्यांनी आयुष्यात समतोल साधला आहे. आपल्या आवडीचं व्यवसायात रुपांतर करून त्या स्वावलंबी बनल्या आहेत. किरण यांच्याकडून बरंच काही शिकता येईल.