भरणेतील बेकरीमधील प्रकार, तक्रार न दिल्याने प्रकार अंधारात
प्रतिनिधी/ खेड
शहरानजीकच्या भरणेनाका येथील एका बेकरीमध्ये तळे येथील एका ग्राहकाने खरेदी केलेल्या ढोकळय़ाच्या चटणीत मृतावस्थेतील बेडूक आढळल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. संबंधित ग्राहकाने याबाबत तक्रार न दिल्याने हा प्रकार अंधारातच होता. मात्र मात्र, चार दिवसांनी सोशल मिडियावर हा प्रकार व्हायरल होताच खळबळ उडाली आहे. बेकरीतील पदार्थामध्ये किडे आढळल्याचा प्रकार ताजा असतानाच हा नवा प्रकार उजेडात आल्याने अन्न औषध प्रशासन विभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
तळे येथील ग्राहकाने या बेकरीतून चार दिवसांपुर्वी ढोकळा खरेदी केला. हा ढोकळा घरी नेल्यानंतर मुलांना खाण्यासाठी देत असतानाच चटणीमध्ये मृतावस्थेतील बेडूक सापडल्याने त्यांना धक्काच बसला. मात्र याप्रकरणी संबंधित ग्राहकानेही तक्रार देण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार अंधारातच होता. मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून हा प्रकार व्हायरल झाल्याने सर्वत्र चटणीतील ‘बेडका’चीच चर्चा रंगली आहे. या निमित्ताने आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. बेकरीतील खाद्यपदार्थांच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाला आता तरी वेळ मिळणार आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. यापार्श्वभूमीवर बेकरी व्यावसायिकावर काय कारवाई होणार? याकडेच लक्ष लागले आहे.
यापूर्वी बाजारपेठेतील एका बेकरीतून ढोकळा खाल्लेल्या पाचजणांना विषबाधा झाली होती. ही घटना ताजी असतानाच खेड-भरणे मार्गावरील शिवाजी चौकातील एका बेकरीतील केकमध्ये अळय़ा आढळल्या होत्या. याबाबत अन्न प्रशासनाने केलेल्या तपासणीत मुदत संपलेले पदार्थ आढळून आल्यानंतर या बेकरीला सील ठोकण्यात आले होते. भरणे येथील अन्य एका बेकरीतून मंच्युरियनमध्ये बॅन्डीज् पट्टी आढळल्याचा प्रकारही घडला होता. मात्र या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला होता.
शहर परीसरात एकामागोमाग घडलेल्या अनेक प्रकारांमुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मात्र स्थानिक प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाने मात्र हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भरणे परिसरातील चौपदरीकरणामुळे मोक्याच्या ठिकाणावरील दुकाने हटल्यानंतर काहींनी भररस्त्यात उघडय़ावरच दुकाने थाटली आहेत. यामुळेही नागरिकांच्या आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार कायम असून एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. यापार्श्वभूमीवर शहरासह भरणे परिसरातील सर्व बेकरी व चायनिज गाडय़ांची अन्न, औषध प्रशासन विभागाकडून स्वच्छतेची पाहणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आहे.









