ढेबेवाडी / प्रतिनिधी
ढेबेवाडी परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या पाश्र्वभूमीवर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या बेफिकीर नागरिकांच्यावर आता धडक कारवाई सुरू केली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट केली जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यास कारवाई करून त्याची कोविड सेंटरला रवानगी करण्यात येत आह. तर निगेटिव्ह सापडल्यास दंड होणार आहे. शुक्रवार दि. २३ रोजी सकाळी तासाभरातच ६१ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामधील ४ जणांचा रिपोर्ट कोरोना बाधित आल्याने खळबळ उडाली आहे.
चारच दिवसांपूर्वी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी नुकतीच ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोरोना सेंटरची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी परीस्थितीचा आढावा घेतला व आरोग्ययंत्रणा आणि पोलीसांना सूचना दिल्या होत्या. विनाकारण फिरणारा सापडला, की कोरोना टेस्ट, पॉजिटिव्ह आला की डायरेक्ट कोरोना सेंटर.. यामुळे ढेबेवाडी विभागातील नागरिकांनी धास्ती घेतली आहे. ६१पैकी ४ जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून यामध्ये सणबूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सणबूरसह परीसरातून बँकेत येणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. लॉकडाउन व जनताा कर्फ्यु असतानाही लोक बेफिकीरपणे विनाकारण बाहेर पडत आहेत. परंतु प्रशासनाच्या कारवाईमुळे लोक विनाकारण बाहेर पडणार नाहीत. या कारवाईत सपोनि संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कपिल आगलावे, अजय माने, नवनाथ कुंभार, संदेश लादे, होमगार्ड संग्राम देशमुख, रोहित झेंडे, तानाजी डाकवे, विशाल मोरे, संकेत तडाखे, आशिष पुजारी, सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. ए. डी. जाधव, आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांचा सहभाग होता.