प्रतिनिधी/ बेळगाव
अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजासमोर पुन्हा ढगाळ वातावरणामुळे चिंतेचे सावट पसरले आहे. मागील दोन दिवसांपासून अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने रब्बी हंगामावर चिंतेचे सावट पसरले आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर पडला होता. काही ठिकाणी पेरणी झालेल्या मसूर, वाटाणा, हरभरा पिकांना फटका बसला. त्यातच आता ढगाळ वातारण निर्माण झाल्याने चिंता वाढली आहे.
अवकाळी पाऊस अतिप्रमाणात झाल्याने भातपिकांना मोठा फटका बसला होता. शिवाय सुगी हंगाम लांबणीवर पडला होता. काही ठिकाणी अद्याप शिवारात पाणी आणि ओलावा असल्याने रब्बी हंगामातील पेरण्या झाल्या नाहीत. त्यातच बदलत्या हवामानामुळे पिके अडचणीत सापडली आहेत.
तालुक्मयातील उचगाव, बसुर्ते, गोजगा, कोनेवाडी, आंबेवाडी, तुरमुरी, बाची, कल्लेहोळ, अतिवाड, कुदेमनी, सुळगा, हंदिगनूर, केदनूर, मण्णिकेरी, काकती, होनगा, कडोली, जाफरवाडी आदी भागात उन्हाळी बटाटा व भाजीपाल्याची लागवड केली जाते. मात्र, अद्याप काही शिवारात अधिक प्रमाणात ओलावा असल्याने बटाटा आणि भाजीपाला लागवड लांबणीवर पडली आहे. त्यातच अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने कामात व्यत्यय निर्माण होत आहे.
बटाटा लागवडीवर परिणाम
तालुक्मयाच्या पश्चिम भागात उन्हाळी बटाटा बियाणांची अधिक प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, यंदा अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे लागवडीवर परिणाम होण्याची शक्मयता आहे. सुगी हंगाम लांबणीवर पडल्याने रब्बी हंगामातील कामे वेळेवर झाली नाहीत. काही शिवारात अद्याप ओलावा आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील उन्हाळी बटाटा आणि भाजीपाला लागवडीवर परिणाम झाला आहे.









