प्रतिनिधी / विटा
गेल्या आठवडाभर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने निर्यातक्षम द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. घडकुज, मणीगळ, दावण्या आणि करपा रोगाने द्राक्षबागा उध्वस्त होत आहेत. पावसाने थोडी जरी उघडीप दिली, तरी औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. मात्र औषधांच्या वाढत्या किंमतीने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडणार आहे.
गतवर्षी खराब हवामानाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी उशीरा छाटणी केली. यंदाही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका द्राक्ष बागांना बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसाने छाटणी होऊन ३५ ते 50 दिवस झालेल्या बागांची, द्राक्षघडांची कुज, मणीगळ सुरू आहे. अनेक बागांमध्ये दावण्या आणि करपा रोगाने थैमान घातले आहे.
निर्यातक्षम बागाचे सत्तर टक्के नुकसान झाले आहे. राहिलेली बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असुन महागड्या औषधांची फवारणी सुरु आहे. वातावरणाचा लहरीपणा असाच चार दिवस राहणार असल्याने बागायतदारांचा जीव टांगणीला लागला आहे.