धावपट्टी न मिळाल्याने विमानांना माघारी परतावे लागले
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावमध्ये सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. याचा फटका विमानसेवेला व प्रवाशांना बसला. बेळगावमध्ये आलेल्या विमानांना उतरण्यासाठी धावपट्टी मिळत नसल्याने काही विमानांना माघारी परतावे लागले तर काही विमाने दुसऱया विमानतळावर उतवरण्याची वेळ आली. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. प्रवाशांना विमानाची वाट पाहत विमानतळावर बसावे लागले. यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.
मागील दोन दिवसांपासून बेळगाव जिल्हय़ात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण दुसऱया दिवशीही पहायला मिळाले. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे विमान सेवेला त्याचा फटका बसला. दुपारनंतर मात्र वातावरण बदल झाल्याने पुन्हा विमानांचे सुरक्षित लँडिंग करणे सोपे झाले.
नियोजित वेळेनुसार हैद्राबाद येथून ट्रुजेट कंपनीचे आलेले विमान बेळगावमध्ये दाखल झाले. परंतु ढगाळ वातावरणामुळे बेळगावची धावपट्टी मिळण्यास अडचणी येत होत्या. यामुळे दोन ते तीन घिरटय़ा घालून विमान जवळच्या हुबळी विमानतळावर उतरविण्यात आले. तसेच बेंगळूर येथून आलेले इंडिगोचे विमान पुन्हा माघारी बेंगळूरला परतले. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
निश्चित माहिती उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.
तिरूपती – बेळगाव विमान रद्द
धावपट्टी मिळत नसल्याने विमान जवळच्या विमानतळावर उतरावे लागत होते. यामुळे ट्रुजेट कंपनीने खराब हवामानामुळे सोमवारची तिरूपती- बेळगाव ही फेरी रद्द केली. याचा फटका प्रवाशांना बसला. ज्यांना इतर शहरांना जाण्यासाठी कनेक्टिंग विमानांचा प्रवास करायचा होता. त्यांनाही वेळेत पोहचता न आल्याने प्रवास रद्द करण्याची वेळ आली.