
सतरापैकी सात डय़ुरा सिलिंडर सिंधुदुर्गात पोहोचले : उर्वरित दहा आठवडाभरात होणार प्राप्त
- स्टँडबाय ऑक्सिजन क्षमतेत 510 जम्बो सिलिंडर एवढी वाढ
- कोल्हापूरबरोबरच रत्नागिरी येथून मिळणार ऑक्सिजन
- जिल्हा कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेडमध्ये 20 ने वाढ
- ऑक्सिजन कमी पडू देणार नाही – के. मंजुलक्ष्मी
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
जिल्हय़ातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणि महाराष्ट्रासह लगतच्या गोवा, कर्नाटकमध्ये ऑक्सिजनचे शॉर्टेज वाढू लागल्याने पुढील धोका ओळखून जिल्हा प्रशासनाने जिल्हय़ासाठी तब्बल सतरा ऑक्सिजन डय़ुरा सिलिंडरच्या खरेदीसाठी ऑर्डर नोंदवली आहे. त्यातील सात सिलिंडर प्राप्त झाले असून उर्वरित दहा येत्या आठवडाभरात सिंधुदुर्गात पोहोचत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी एका छोटय़ा मुलाखती दरम्यान तरुण भारतशी बोलताना दिली. या डय़ुरा सिलिंडरमुळे सिंधुदुर्गची स्टँडबाय ऑक्सिजनची क्षमता तब्बल 510 जम्बो सिलिंडरनी वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हय़ातील कोरोना बाधितांची वाढती संख्या व सिंधुदुर्गला ऑक्सिजन पुरवणाऱया लगतच्या गोवा, कोल्हापूर, कर्नाटक येथे ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्याने याचा परिणाम सिंधुदुर्गच्या ऑक्सिजन पुरवठय़ावर होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी याचा मोठा फटका सिंधुदुर्गातील कोरोना बाधित रुग्णांना बसू शकतो. या विषयावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना विचारले असता त्यांनी वरील माहिती दिली. भविष्यातील ऑक्सिजनच्या शॉर्टेजची भीती लक्षात घेऊन आपला जिल्हा ऑक्सिजनच्या स्वयंपूर्णतेकडे चालू लागला असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा कोविड रुग्णालयात दोन पी. सी. ए. म्हणजे सेल्फ ऑक्सिजन जनरेटर प्लांट यापूर्वीच कार्यरत झाले आहेत. पैकी दुसरा प्लांट दोनच दिवसांपूर्वी कार्यरत झाल्यानंतर जिल्हा कोविड रुग्णालयात तब्बल 20 अतिरिक्त ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हय़ात कुडाळ महिला रुग्णालय आणि कणकवली उपजिल्हा रुग्णालयातही अशाच प्रकारचे ऑक्सिजनचे सेल्फ जनरेट प्लांट उभे राहत असल्याचे त्या म्हणाल्या.
आता 590 जम्बो सिलिंडर एवढा ऑक्सिजन राहणार स्टँडबाय
पी. सी. ए. प्लांटबरोबरच जिल्हा रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजनचा सेंट्रल ऑक्सिजन प्लांट असून आता त्याला सपोर्ट देण्यासाठी तब्बल 17 डय़ुरा सिलिंडर खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एका डय़ुरा सिलिंडरमध्ये जवळपास 30 जम्बो सिलिंडरमध्ये मावेल एवढा ऑक्सिजन स्टोअर करता येतो. याचाच दुसरा अर्थ असा की, आता आपल्याकडे तब्बल 510 जम्बो सिलिंडर एवढा लिक्विड ऑक्सिजन आपण आता स्टँडबाय म्हणून स्टाअर करून ठेवू शकणार आहोत. या स्टँडबाय स्टोअर ऑक्सिजनचा उपयोग शॉर्टेज काळात जर ऑक्सिजन डिलिव्हरी मंदावली, तर त्यावेळी आपणास होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांच्या ऑक्सिजन सप्लायमध्ये फारशी बाधा येणार नाही आणि या प्रमुख उद्देशानेच या डय़ुरा सिलिंडरचे प्रयोजन करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
ऑक्सिजनसाठी गोव्याचे दरवाजे तूर्त बंद
या डय़ुरा सिलिंडरसाठी लागणारा ऑक्सिजन कुठून उपलब्ध करणार, असे विचारले असता त्या म्हणाल्या, सध्या गोव्यातून जो मंदगतीने पुरवठा सुरू होता, तोही आता बंद झाला आहे. गोव्याचीच डिमांड वाढल्याने गोव्याने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर येथून तसेच राज्याच्या कोटय़ातून रायगडमधून आणून रत्नागिरीत स्टोअर केलेल्या ऑक्सिजनमधील काही कोटा आपणास मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हय़ात या व्यतिरिक्त खासगी स्तरावर एक मोठा ऑक्सिजन प्लांट उभा करण्याच्या दृष्टीने देखील हालचाली सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ऑक्सिजनची समस्या सगळीकडेच असली, तरी अतिशय काटेकोर नियोजन करून आपण आपल्या जिल्हय़ाला ऑक्सिजन कमी पडू देणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









