आधी युद्धात, नंतर उच्चभ्रू हॉटेलात, नंतर लग्नात आणि आता वैद्यकीय क्षेत्रात वापरला जाणारा शोध म्हणजे ड्रोन ऊर्फ मानवरहित विमान.
शत्रूच्या प्रदेशात टेहळणीसाठी पाठवायला सोपं वाहन म्हणून ठाऊक झाल्यावर ड्रोन भारतात आला. साधारणतः पाश्चात्य देशात एखादा शोध लागल्यावर आपल्याकडचे अभ्यासू लोक प्राचीन ग्रंथ चाळून तो शोध आपल्याकडे पूर्वीच लागल्याचे सिद्ध करतात. हल्ली ही प्रथा मागे पडली आहे. आपल्या शेजारचा आपल्याला त्रास देणारा चीन आपल्यासारखाच प्राचीन परंपरा वगैरे असलेला देश. पण पाश्चात्य देशात लागलेला कोणताही शोध आधी आम्ही लावला होता असा दावा चिनी लोक करत नाहीत. उलट पाश्चात्य देशांनी बनवलेले कोणतेही यंत्र ते लगेच स्वतः बनवायला घेतात आणि मूळ देशापेक्षा कमी किमतीत विकायला आणतात. मोबाईल, संगणक आणि त्यांचे सुटे भाग ही त्याची उदाहरणे. कोरोनामुळे सध्या त्याचे कंबरडे मोडलेले असावे. नाहीतर आपल्याकडे दिवाळीत लहान मुलांना खेळण्यासाठी शंभर रुपये डझन भावात छोटी ड्रोन विमानेदेखील बाजारात आली असती. पतंगांच्या काटाकाटीचा खेळ खेळतात त्या चालीवर आपल्या बालकांनी ड्रोन काटाकाटीचा खेळ विकसित केला असता.
उच्चभ्रू हॉटेलात खाद्यपदार्थ पोचवण्यासाठी
छोटा ड्रोन वापरतात. आपल्याकडे लग्नातला सर्वात मोठा विधी म्हणजे फोटो आणि व्हीडिओ
काढून पुढची अनेक वर्षे घरी आलेल्या पाहुण्यांना प्रेमाने दाखवून नंतर जेवायला घालणे.
श्रीमंतांच्या लग्नात फोटो काढण्यासाठी ड्रोनचा वापर सुरू झाला आहे. कॅमेरा आणि मोबाईल
वापरून समोरून फोटो काढतात. ड्रोन वरून फोटो काढतो. ड्रोन खाली डोके वर पाय अवस्थेत
काम करू शकतो का ठाऊक नाही. तसे शक्मय असेल तर मंगल कार्यालयात जागोजागी खंदक खणून
ड्रोन खालच्या बाजूने देखील फोटो काढील.
तूर्तास सगळेच सार्वजनिक कार्यक्रम ठप्प झाले आहेत.
सरकार सर्वांना आवाहन करते आहे की विनाकारण रस्त्यावर येऊन गर्दी करू नका. नेहमीप्रमाणेच
लोक ऐकत नाहीत. नेहमीप्रमाणेच पोलिसांचा मार खात आहेत. पण पोलीस तरी बिचारे कुठे कुठे
पुरे पडणार. आता कोरोनाग्रस्त किंवा संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर
करणार आहेत असे वाचले. रस्त्यावर निरुद्देश भटकून सरकारी आवाहन धाब्यावर बसवण्यासाठी
देखील ड्रोनचा उपयोग होईलच. फोटोत सगळे आपसूक सापडतील. विज्ञानाने लावलेल्या शोधाचा
सदुपयोग झाल्याचे आपल्याला श्रेय मिळेल, हे कमी नाही!








