बीएसएफच्या कार्यक्रमात शाह यांचे उद्गार – प्रत्येक आव्हानासाठी तयार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका सोहळय़ात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी भाग घेतला आहे. या सोहळय़ात गृहसचिव अजय भल्ला आणि आयबीचे संचालक अरविंद कुमार देखील उपस्थित हेत. शाह यांनी यावेळी थेट नामोल्लेख न करता पाकिस्तानला कठोर संदेश दिला आहे.
सीमा सुरक्षित असणारा देशच सुरक्षित आहे. ड्रोन पाठविले जात आहेत, भुयारे खणली जात असली तरीही आम्ही या आव्हानांसाठी तयार आहोत. देशाविरोधात रचल्या जाणाऱया प्रत्येक कटाला प्रत्युत्तर देण्यात येत आहेत. बीएसएफची पथके भुयाराचा शोध लावून त्यांचे विश्लेषण करत ते किती दिवसांपूर्वी तयार झाले असेल? किती लोकांनी घुसखोरी केली असेल याचा शोध लावून लवकरात लवकर समस्येवर मात करतात असे शाह यांनी म्हटले आहे.
बलिदान विसरता येत नाही
सर्वोच्च बलिदान दिलेल्या लोकांना मी सलाम करतो. बीएसएफचे जवान देशाच्या सीमांची सुरक्षा करत असल्याचे पूर्ण देश जाणतो. याचमुळे आज देश लोकशाहीचा अवलंब करत विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. जवानांचे बलिदान कधीच विसरता येत नसल्याचे शाह म्हणाले.
सीमा सुरक्षा
सीमा सुरक्षेत तैनात बीएसएफ आणि सर्व निमलष्करी दलांमुळेच आज भारत जगाच्या नकाशावर स्वतःचे गौरवशाली स्थान नोंदवू शकत आहे. सीमा सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षा आहे. आमच्यासमोर अनेक आव्हाने असून निमलष्करी दलांवर पूर्ण भरवसा असल्याचे उद्गार केंद्रीय मंत्र्यांनी काढले आहेत.
स्वतंत्र संरक्षण धोरण
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आमचे एक स्वतंत्र संरक्षण धोरण आहे. याच्या अंतर्गत आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱयाला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाते. आजचा भारत कुणासमोर झुकत नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोपरि मानत आव्हानांना भिडत असल्याचे शाह म्हणाले.
2003 पासून दरवर्षी सोहळा
बीएसएफचा अलंकरण सोहळा 2003 पासून दरवर्षी बीएसएफचे पहिले महासंचालक आणि पद्मविभूषणने सन्मानित के.एफ. रुस्तमजी यांच्या जन्मदिनी आयोजित करण्यात येतो. चालू वर्षात 27 जवानांना सन्मानित करण्यात आले आहे. यातील 14 जणांना शौर्यासाठी पोलीस पदक आणि 3 निवृत्तांसह 13 जणांना कौतुकास्पद सेवेसाठी पोलीस पदकाने गौरविण्यात आले आहे.









