ऑनलाईन टीम / बीजिंग :
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनची लोकसंख्या आता 1.41 अब्ज एवढी झाली आहे. गेल्या 10 वर्षांत चीनच्या लोकसंख्येत 5.38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने अधिकृतपणे चीनच्या नवीन लोकसंख्येची आकडेवारी जाहीर केली आहे.
2019 च्या तुलनेत चीनची लोकसंख्या 0.53 टक्क्यांनी वाढून 1.41 अब्ज झाली आहे. 2019 मध्ये चीनची लोकसंख्या 1.4 अब्ज होती. मात्र, पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून त्यात घट होण्याची शक्यता आहे. चीन सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या सातव्या राष्ट्रीय लोकसंख्या जनगणनेनुसार चीनमधील सर्व 31 प्रांत, स्वायत्त प्रदेश आणि नगरपालिकांची लोकसंख्या 1.41 अब्ज होती.
चीनमध्ये 60 वर्षे आणि त्यापुढील लोकांची संख्या 26.4 कोटी आहे. 89.4 कोटी लोक 15 ते 59 वयोगटातील आहेत, जे 2010 च्या तुलनेत 6.79 टक्क्यांनी कमी आहेत. लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी चिनी नेत्यांनी 1980 पासून जन्ममर्यादा लागू केली, पण आता देशातील कामगार-वृद्धांची संख्या झपाट्याने कमी होत आहे आणि समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांना अडथळा येत आहे, याची त्यांना चिंता आहे.