बेंगळूर/प्रतिनिधी
ड्रग्स रॅकेटचा तपास करणार्या सेंट्रल क्राइम ब्रँचने (सीसीबी) रागिनी आणि संजना या दोन अभिनेत्रींची चौकशी करून महत्त्वपूर्ण माहिती मिळविली आहे. दोन्ही निवेदनांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. ड्रग्स प्रकरणी सीसीबीने दोघीनांही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
माडीवाल येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) च्या गेस्ट हाऊसमध्ये सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी संजना आणि रागिनीची कित्येक तास चौकशी केली. दोन्ही अभिनेत्रींनी एकूण ३५ हुन अधिक जणांची नवे घेतली आहेत. त्यामध्ये काही कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, नेत्यांची मुले आणि उद्योजकांची नावे आहेत. सीसीबीच्या तपासणीमुळे अनेक बड्या व्यक्तींना घाम फुटला आहे.
संजनाने आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅपवर असणारे सर्व गप्पा आणि ग्रुप मेसेजेस डिलीट केले आहेत. हे संदेश परत मिळवण्यासाठी आयटी कंपन्यांचा सहारा घेण्याचा निर्णय सीसीबीने घेतला आहे. दोन्ही अभिनेत्रींनी पार्टीची ठिकाणे, पार्ट्यांचे संयोजक, सहभागी, ड्रग्जचा वापर आणि इतर अनेक बाबींविषयी माहिती दिली आहे.
अशी माहिती मिळाली आहे की वीरेन खन्ना आणि राहुल मोठ्या हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये पार्टी आयोजित करत असत. या पार्ट्यांमध्ये विविध भागातील लोक उपस्थित होते. अनेक लोकप्रतिनिधी,त्यांची मुले, वरिष्ठ अधिकारी, अनेक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक हजर होते. ज्यांची नावे घेतली आहेत त्यांची यादी तयार करुन त्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. हॉटेल आणि रिसॉर्ट्सच्या मालक आणि व्यवस्थापकांचीही चौकशी केली जाणार आहे.









