बेंगळूर/प्रतिनिधी
सेंट्रल क्राइम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी ड्रग तस्कर प्रकरणात फरार आरोपी आदित्य अल्वा याला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य अल्वाला सीसीबी पोलिसांनी सोमवारी रात्री चेन्नईमध्ये अटक केली आहे.
४ सप्टेंबर रोजी कॉटनपेट पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाल्यापासून फरार असलेला अल्वा हा दिवंगत मंत्री जीवनराज अल्वा यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याचा मेहुणा आहे. ड्रग प्रकरणात कन्नड अभिनेत्यांचा समावेश असलेल्या १२ आरोपींमध्ये त्याचा समावेश आहे.
एका निवेदनात सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी ड्रग प्रकरणात फरार आरोपी आदित्य अल्वा याला अटक करण्यात आली आहे. सतत शोध आणि चौकशी करण्यात येत होती, तो ज्याठिकाणी होता त्या ठिकाणाची माहिती पिलिसांना मिळताच काल रात्री त्याला चेन्नई येथे अटक केली.
गेल्या काही महिन्यांत पोलिसांनी ड्रग प्रकरणी कन्नड अभिनेत्री रागिणी द्विवेदी आणि संजना गलराणी, पार्टी संयोजक वीरेन खन्ना आणि रिअल्टर राहुल थॉन्से यांना अटक केली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये सीसीबी पोलिसांनी उत्तर बंगळूरच्याच्या हेब्बळ येथील अल्वाच्या निवासस्थानावर छापा टाकला होता. यापूर्वी सीसीबीने अल्वाविरूद्ध लुकआउट नोटीसही बजावली होती.
ऑक्टोबर २०२० मध्ये पोलिसांनी अल्वाच्या शोधात ओबेरॉयच्या मुंबई निवासस्थानावर छापा टाकला आणि सीसीबीने ओबेरॉयची पत्नी प्रियंका अल्वा आणि आदित्यची बहीण यांना या प्रकरणात चौकशीत सामील होण्यास सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हाड्रग प्रकरणातील ६ नंबरचा आरोपी आहे. आता त्याला चौकशीसाठी बेंगळूर येथे आणण्यात आले आहे आणि पुढील चौकशीसाठी त्याला कोठडी घेण्यासाठी विशेष कोर्टासमोर हजर केले जाईल.