अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या माध्यमातून समोर आलेले बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन हे हिमनगाचे टोक होते असेच म्हणावे लागेल. अमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेलेली बॉलिवूड ड्रग्ज सिंडीकेटची ही व्याप्ती प्रत्यक्षात किती प्रचंड आणि खोलवर रुतली आहे, याचा पर्दाफाश अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) केला. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीतसिंह या टॉपच्या चित्रपटतारका सध्या एनसीबीच्या चौकशीच्या रांगेत आहेत. या चौघींना चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्यांच्या असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दीपिका पदुकोणचे नाव समोर आल्यामुळे तर प्रचंड खळबळ उडाली. दीपिकाच्या चर्चेमुळे कोरोना, आंतरराष्ट्रीय सीमातणाव, कृषी विधेयक, कामगार विधेयक या सर्व महत्त्वाच्या चर्चा मागे पडल्या. माध्यमांमध्ये त्याची जागा दीपिकाने घेतली. कारण सध्याच्या घडीला तिच्यावर चित्रपट व जाहिरात व्यावसायिकांचे 600 कोटी अडकले आहेत. ड्रग्जप्रकरणी बॉलिवूडमधील टॉपचे आणखी पन्नासहून अधिक कलाकार एनसीबीच्या रडारवर असल्याचे समजते. रुपेरी पडद्यावर विविध भूमिकेतून चाहत्यांसमोर येणाऱया अभिनेत्रींचे जेव्हा वास्तव जीवनातील अंधाऱया जगातील नशिले रूप जसजसे समोर येऊ लागले तसे आश्चर्याबरोबर अपेक्षाभंगाचे हादरे बसू लागले. कोणाच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची गरज नाही हे खरे असले तरी बहुतांशी तरुणाईचे ‘रोल मॉडेल’ असणाऱया या तारे-तारकांची ओंगळवाणी नशिली बाजू भारतीय समाजाला मानवणारी नाही हे मात्र निश्चित. त्यांच्या भूमिकेला भुलून आणि स्वत:ला त्या प्रतिमेत बसवत त्यांच्या सर्व कृती प्रमाण मानून मार्गक्रमण करणारा फार मोठा चाहतावर्ग देशात आहे. बहुतांश तरुण सर्वच माध्यमांवर त्यांना फॉलो करतात. तरुणाईच्या पार्श्वभूमीवर चित्रपट तारे-तारकांची काळी बाजू समोर येणे ही खरी चिंतेची किंवा भयभीत करणारी बाब आहे. जगातील सर्व सुखे पायाशी लोळण घेत असताना हे स्टार अभिनेते व अभिनेत्री अमली पदार्थांच्या जाळय़ात का ओढले जातात? त्यांची अपरिहार्यता असते की अल्पवयात मिळालेला पैसा, प्रतिष्ठेची मस्ती असते? भौतिक ताणतणावाच्या जगापासून दूर नेणारा हा अत्यानंद का हवासा वाटतो? या सर्वांची कारणमीमांसा करायची झाल्यास चित्रपट उद्योगातील जीवघेणी स्पर्धा आणि तंत्रज्ञानामुळे या उद्योगाला प्राप्त झालेले व्यापक स्वरुप कारणीभूत ठरत आहे. उद्योगाची व्याप्ती वाढल्यामुळे स्पर्धकांची संख्या वाढली. मग स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी कुठलीही गोष्ट वर्ज्य नाही. कामाचे तास वाढले तरी चालतील. त्यामुळे येणारा शारीरिक आणि मानसिक थकवा. यातून व्यसनांकडे वळणे ओघाने आलेच. अमली पदार्थांच्या सेवनानंतर शरीराला आणि मनाला वाटणारा आरामाचा भास आणि यातून जडलेली सवय. ड्रग्ज नाही स्वीकारले तर ड्रग्ज सिंडीकेटकडून मागासलेले, बुरसटलेले किंवा त्यांच्या ‘क्लासचे’ नसल्याचा शिक्का बसण्याचा धोका अधिक. त्यामुळे ती अपरिहार्यता बनते. कालांतराने अमली पदार्थ शरीराची व मनाची गरज बनते. तलफ आल्यानंतर अमली पदार्थ न मिळाल्यास ते आणखीन नैराश्येच्या गर्तेत ढकलले जातात. एनसीबीने चौकशीला बोलावलेल्या अभिनेत्रींची हीच शोकांतिका आहे. अल्पवयात मिळणारी प्रसिद्धी, लोकप्रियता आणि पैसा हे आणखी एक कारण म्हणावे लागेल. वलयांकित प्रसिद्धीमुळे कलाकार वेगळय़ाच जगात वावरत असतात. आघाडीच्या कलाकारांच्या एका चित्रपटासाठीच्या मानधनाची रक्कम ऐकल्यास आपल्यासारख्यांचे डोळे अक्षरश: विस्फारतात. लाखो सामान्यांच्या आयुष्यभराच्या स्वप्नांच्या पलीकडे हे आकडे असतात. साधारणपणे ए लिस्टेड अभिनेते व अभिनेत्रींना एका चित्रपटासाठी दहा कोटींपासून पस्तीस कोटांपर्यंत रक्कम मिळते. या मिळणाऱया प्रचंड पैशाचे करायचे काय, याची त्यांना चिंता असते. एवढा पैसा मिळवूनही मनाला शांती नाही. यातूनच ते अशा व्यसनांकडे वळतात. चित्रपटात पडद्यावर एखाद्या रंगीत पार्टीची जी दृश्ये दाखवतात त्यापेक्षा कलाकारांचे पडद्यामागील वास्तव भयानक आहे. मिडनाईट नावाखाली सुरु असलेल्या पार्टीमध्ये झगमगते लाईट, मोठय़ा आवाजातील बेहोश करणारे संगीत, ठिकठिकाणी डान्सफ्लोअर आणि या सर्वांवर कडी म्हणजे विविध प्रकारच्या नशिल्या पदार्थांची ऑफर. आपल्या आवडीप्रमाणे ट्रे मधील हवा तो ‘माल’ ते उचलू शकतात. अंमल चढल्यानंतर आभासी जगात प्रवेश होतो. उत्साहाला भरती येते. बेहोश होऊन नाचणे, गाणे आणि डोलणे सुरू होते. उत्तररात्र संपेपर्यंत हा धिंगाणा सुरु असतो. दिवसाउजेडी उच्चभ्रू म्हणून वावरणाऱया या लब्धप्रतिष्ठांचे रात्रीच्या गर्द अंधारातील वेगळेच चेहरे समोर येतात. बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर यांनी आपल्या ‘जागते रहो’ चित्रपटात एका सभ्य समाजाचा बुरखा अशाच पद्धतीने फाडला आहे. दिवसा गरीबांचे मसिहा म्हणून वावरणाऱया या इज्जतदार प्रतिष्ठित मंडळींचे रात्रीच्या अंधारातील वेगळे चेहरे आणि काळे धंदे या चित्रपटात राजकपूर यांनी दाखवले आहेत. नियंत्रणाबाहेर गेलेली सध्याची बॉलिवूडची ड्रग्ज संस्कृती हा गंभीर विषय आहे. ड्रग्ज सिंडीकेटमध्ये समावेश असणारे सर्वजण एनसीबीच्या जाळय़ात आले आहेत. यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागानुसार या सर्वांची ए, बी आणि सी अशी वर्गवारी केली आहे. आता चौकशी सुरु आहे. उद्या कायदेशीर लढाई सुरु होईल. मोबाईलवरील व्हॉटसअप चॅटिंग हा सबळ पुरावा मानला जाईल किंवा न जाईल. कदाचित या प्रकरणातून कलाकार निर्दोषही सुटतील. पण झाल्या प्रकारामुळे बॉलिवूडच्या प्रतिमेला जो तडा गेला तो सांधला जाणे कठीण. शिवाय आघाडीचे अभिनेते, अभिनेत्री यांच्या वर्तणुकीवर संशयाची सुई रोखली गेली. यामुळे त्यांचे झालेले प्रतिमाहनन. ते नुकसान कधीही भरून न येणारे आहे. वाईटातून चांगले घडते या न्यायाने एवढेच म्हणता येईल, बॉलिवूडच्या मागे धावणाऱया तरुणवर्गाने या आभासी जगापासून काही तरी सुबुद्धी घ्यावी, हीच अपेक्षा.
Previous Articleमराठा ओबीसीकरण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








