प्रतिनिधी /बेळगाव
मंगळवारी कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी राज्यात सुरू असलेल्या ड्रग्ज माफियांच्या कारवाया व बेकायदा दारूविक्रीविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. तरुणाईला व्यसनाधीनतेच्या खाईत ढकलणाऱया ड्रग्जमाफियांवर आणि मटका माफियांवर सरकारने आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली.
आमदार सुकुमार शेट्टी यांच्या तारांकित प्रश्नावर सभागृहात चिंता व्यक्त करण्यात आली. राज्यात ड्रग्जमाफियांच्या कारवाया वाढल्या आहेत. खासकरून विद्यार्थी व तरुणाई या माफियांच्या जाळय़ात सापडत आहेत. त्यांना वाचविण्यासाठी सरकारने कोणते उपक्रम हाती घेतले आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले, केवळ पोलिसांकडून ड्रग्जमाफियांवर नियंत्रण मिळविणे शक्मय नाही. समाज जागृत होऊन पोलिसांना सहकार्य केले तरच ते शक्मय होणार आहे. डार्कनेट व पोस्टल कुरियरच्या माध्यमातून चालणाऱया अमलीपदार्थांच्या व्यवसायावर बारीक लक्ष आहे. मटका व्यवसाय थोपविण्यासाठीही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सरकारने पोलीस स्थानकनिहाय तयारी केल्याचे त्यांनी सांगितले.
2018 मध्ये 1 हजार 30, 2019 मध्ये 1661, 2020 मध्ये 4062 व 2021 च्या नोव्हेंबर अखेरपर्यंत 4 हजार 965 गुन्हे ड्रग्जमाफियांविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. शाळा-कॉलेजना भेटी देऊन अमलीपदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागृती करण्यात येत आहे. पोलिसांनाही गुप्त माहितीवर आधारित कारवाई करण्याची सूचना दिली आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.









