ऑनलाईन टीम / मुंबई :
ड्रग्ज प्रकरणात अभिनेता आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक एजाज खान याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. मुंबईच्या एसप्लांडे कोर्टाने एजाज खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. मागील तीन महिन्यांपासून एजाज तुरूंगात आहे. त्याच्या घरातून नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ड्रग्ज जप्त केले, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
30 मार्च रोजी एनसीबीने मुंबईतील एजाजच्या घरावर छापा टाकला होता. या छाप्या दरम्यान, एनसीबीला अभिनेत्याच्या घरातून अशी काही औषधे सापडली, ज्यावर भारतात बंदी घातली गेली आहे. यानंतर एजाजला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीच्या दुसर्याच दिवशी म्हणजे 31 मार्च रोजी एनसीबीने एजाज खानला अटक केली.
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या टीमला एजाज खानच्या घरात अल्प्रझोलम गोळ्या सापडल्या आहेत, ज्यावर भारतात बंदी आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, एजाज खान हा ड्रग पेडलर शादाब फारूक शेख ऊर्फ शादाब बटाटाच्या सिंडिकेटचा एक भाग आहे. एजाजच्या अटकेच्या आठवड्यापूर्वी शेख याला एनसीबीने अटक केली होती. त्याच्याकडून एनसीबीने बंदी घातलेल्या 2 किलोहून अधिक मॅफेड्रॉन औषध जप्त केली होती.
दरम्यान, एजाज याने आपल्या निवेदनात असा दावा केला होता की, एनसीबीने त्याच्या घरातून काहीही जप्त केलेले नाही आणि तो निर्दोष आहे. त्याचा ड्रग्सशी काही संबंध नाही. एजाजने त्याच्या घरातून मिळणारी औषधे झोपेच्या गोळ्या म्हणून सांगितली होती. एजाज म्हणाला की, त्याची पत्नी नैराश्याने ग्रस्त आहे आणि ती स्वतः ही औषधे घेते..
अटकेच्या एका आठवड्यानंतर एजाज खानचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता, त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर एजाज खानच्या संपर्कात आलेल्या एनसीबीच्या सर्व अधिकाऱ्यांचीही चाचणी घेण्यात आली होती.