ऑनलाईन टीम / पणजी :
आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक एकापाठोपाठ एक खुलासा करत आहेत. क्रूझ पार्टीचा महत्वाचा भाग असलेल्या दाढीवाल्या माणसाचे नाव उघड करण्यासाठी त्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली होती. ड्रग्ज पार्टीत नाचणारा तो दाढीवाला माणूस म्हणजे काशिफ खान. हा फॅशन टीव्हीचा प्रमुख, ड्रग्ज माफिया आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचा मित्र आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते. आता मलिकांनी थेट त्या वादग्रस्त क्रूझ पार्टीमधील व्हिडीओच शेअर केला आहे.
मलिक यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सायंकाळी 6 वाजून 26 मिनिटांनी काहीजण क्रूझवरील स्विमिंग पूलच्या आजूबाजूला गाण्यांवर नाचताना दिसत आहेत. त्यामध्ये हिरव्या रंगाच्या शर्टमधील व्यक्ती ही व्यक्ती रेव्ह पार्टी आयोजित करणाऱ्या फॅशन टिव्हीच्या प्रमुख काशिफ खान असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. काशिफ हा देशभर फॅशन शो आयोजित करतो. या शोमध्ये बेधडक ड्रग्ज विकलं जातं. मोठय़ा प्रमाणावर सेक्स रॅकेट चालवण्याचं काम तो करतो. क्रूझवरील ड्रग पार्टीची आमंत्रणं त्यानं सोशल मीडियावरूनही पाठवली होती. मात्र, त्याला अटक करण्यात आली नाही, कारण तो समीर वानखेडे यांचा मित्र आहे, असेही मलिक यांनी म्हटले आहे.