बेंगळूर/प्रतिनिधी
११ ऑगस्टच्या बेंगळूर हिंसाचार प्रकरणी आणि ड्रग्ज प्रकरणात दोन चित्रपट अभिनेत्री आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांना जामीन मंजूर करावा, अशी मागणी करणारे धमकीचे पत्र ड्रग्ज प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या एनडीपीएसच्या विशेष न्यायाधीशांना सोमवारी मिळाल्याचे गुन्हे शाखेचे सहआयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले. या पत्राबरोबर स्फोट घडवून आण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे एक पार्सल देखील सापडले आहे.
पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटमध्ये अटक केलेल्या संशयितांना जामीन मंजूर करण्यास नकार दिल्यास आणि डीजे हळ्ळी आणि केजी हळ्ळी दंगली प्रकरणात अटक केलेल्या निरपराध लोकांना सोडण्यास नकार दिल्यास हल्ले करण्याची धमकी या पत्रात देण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे पार्सल कोर्ट हॉल-३७ च्या बाहेर सापडले. संदीप पाटील यांनी पत्राचा स्रोत शोधण्यासाठी हालचाली सुरु केल्या असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व तपास सुरु असल्याचे म्हंटले आहे.









