मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा आदेश, गोवा पोलिसांच्या निष्क्रियतेवर देशभरात चर्चा,हैद्राबाद पोलिसांचे गोवा पोलिसांवर जोरदार आरोप
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील ड्रग्स प्रकरणे वाढली आणि गोवा पोलिसांची निष्क्रियता उघडकीस आली. हैद्राबाद पोलिसांनी देखील गोवा पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवून मुख्य ड्रग्ज पॅडलरला अटक करण्यात गोवा पोलीस मुळीच सहकार्य देत नसल्याची खरमरीत टीका केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सायंकाळी पणजीत वरिष्ठ पातळीवर पोलीस अधिकारी आणि उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांच्या बैठकीत सोमवारपासून जमेल तेवढय़ा ड्रग्ज विक्रेत्यांना अटक करा, कडक धोरण स्वीकारा, त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा, तसेच आजपासून पाळत ठेवा, असेही आदेश दिले.
मुख्यमंत्र्यांनी अत्यंत तातडीची बैठक बोलावून त्यात सांगितले की, राज्याची ड्रग्ज प्रकरणात मोठी बदनामी होतेय. पोलिसांनी आता कडक धोरण अवलंबवावे. एवढेच नव्हे तर यानंतर सोमवारपासून ड्रग्ज प्रकरणात जे जे कोणी अडकले असतील, त्यांचे धागेदोरे जरी सापडले तरी त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी व या सर्वांनाच अटक करावी तसेच ड्रग्ज माफियांचे अड्डे तातडीने उद्ध्वस्त करावे, असे सांगितले आहे.
ड्रग्जवाल्यांना उचला आणि थेट आत बसवा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरील माहिती शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बैठकीनंतर दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, आपण सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांना तंबी दिली आहे. ड्रग्सप्रकरणे वाढता कामा नये. शनिवारपासूनच कडक धोरण अवलंबण्यास सुरुवात करा आणि सोमवारपासून ड्रग्ज व्यवहारात असलेल्यांना उचला आणि थेट आतमध्ये नेऊन बसविण्यास सांगितले आहे.
ड्रग्स विरोधी पोलीस पथकास मिळणार जादा अधिकार व यंत्रणा
राज्य सरकारच्या ड्रग्स विरोधी पथक (एएनसी) या अन्वेषण विभागाला आणखी मजबूत बनविले जाईल. आवश्यक तेवढय़ा पोलीस अधिकाऱयांच्या नियुक्त्या या विभागात केल्या जातील. त्याचबरोबर एनटीपीसी या राष्ट्रीय स्तरावरील कायद्यांतर्गत मादक पदार्थ विरोधी विभाग तथा पथकाला यानंतर जादा अधिकार दिले जातील. एकेकटय़ाच्या मुसक्या आवळल्या जातील, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
हैद्राबाद पोलिसांचे गोवा पोलिसांवर आरोप
दरम्यान, हैद्राबाद पोलिसांना ड्रग्स प्रकरणात हवा असलेला आणि गोव्यात स्थानिक असलेला एडविन नुनीस हा हैद्राबाद ड्रग्स प्रकरणात अडकल्याचा दावा हैद्राबाद पोलिसांनी केला. त्याला अटक करुन ताब्यात द्या अशी मागणी हैद्राबाद पोलिसांनी गोवा पोलिसांकडे केली होती. परंतु गोवा पोलीस गांभिर्याने घेत नाही व सहकार्य करीत नसल्याचा थेट आरोप हैद्राबाद पोलीस कमिशनरांनी केला आहे.
गोवा पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले. सदर व्यक्तीला अटक करण्यासाठी हैद्राबाद पोलिसांनी कधीच मागणी केलेली नव्हती, असे गोवा पोलिसांनी म्हटले आहे. एकंदरित या विषयावरुन गोवा पोलिसांची निंदा झालेली आहे.









