जि.प.सह रत्नागिरीतील बसणी पंचक्रोशीत हळहळ
प्रतिनिधी/ रत्नागिरी
एखाद्या कुटुंबाच्या हसत्या-खेळत्या संसारावर कधी दुर्दैवाचा फेरा येईल, याचा नेम सांगता येत नाही. अशीच एक घटना रत्नागिरीकरांना चटका लावून गेली. जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागात सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील नंदकुमार कदम व त्यांची मुलगी प्राजक्ता (28) या दोघा बाप-लेकीच्या एकामागोमाग झालेल्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नंदकुमार कदम गेली जवळपास ते 25 वर्ष जि. प. भवनात विविध विभागात कार्यरत होते. त्यांनी आपली मुलगी बरी व्हावी, तिने आजारावर मात करून पुन्हा हसत-खेळत हिंडावे यासाठी त्यांनी मोठी धडपड केली. मात्र नियतीने त्यांच्या कुटुंबावर एकप्रकारे घालाच घातला. त्यांची मोठी मुलगी प्राजक्ता हिने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका खासगी कंपनीत नोकरीला लागली होती. तसेच तिचे लग्नही ठरलं होतं. यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र हा आनंद फार वेळ टिकला नाही.
एका वर्षांपूर्वी प्राजक्ता अशीच एकदा आजारी पडली होती. तपासणी केली असता तिला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. यामुळे कुटुंब अक्षरशः हादरून गेलं होतं. या परिस्थितीतही न डगमगता प्राजक्तावर उपचार सुरू झाले. पै पै जमा करून नंदकुमार कदम हे उपचारासाठी धडपड करीत होते. गेले वर्षभर ते अनेक वेळा रजा टाकून तिच्या उपचारासाठी जात होते. प्राजक्ता हळूहळू बरी होत होती. मात्र नियतीला ही गोष्ट मान्य नव्हती. दोन दिवसांपूर्वी घरात अचानक तिला फिट आली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नंदकुमार कदम यांनी तिला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यासाठी हालचाल सुरू केली. मात्र त्यांच्या हातावरच तिने अखेरचा श्वास घेतला. डोळय़ादेखत झालेल्या या लाडक्या लेकीच्या मृत्यूने नंदकुमार यांना जबर धक्का बसला. त्या धक्क्याने ते जागीच कोसळले. त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले. पण त्या उपचारादरम्यान नंदकुमार यांचीही प्राणज्योत मालवली. या एकामागोमाग बाप-लेकीच्या मृत्यूने जिल्हा परिषद भवनसह सारी बसणी पंचक्रोशीही पुरती हळहळली. बाप-लेकीवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले.









