लंडनच्या संशोधकांचा खुलासा : मधूमेहामुळे डोळय़ांची समस्या
कोरोना संक्रमण कुठल्या व्यक्तीत किती धोकादायक ठरणार हे अद्याप स्पष्टपणे सांगता येऊ शकत नाही, परंतु काही विशेष प्रकारच्या आजारांनी ग्रस्त व्यक्तींसाठी हे संक्रमण जीवघेणे ठरू शकते. मधूमेहामुळे डोळय़ांचा आजार झाला आहे अशा व्यक्तींमध्ये कोरोना संक्रमणामुळे गंभीर स्वरुपात आजारी होण्याचा धोका सामान्य व्यक्तींच्या तुलनेत 5 पट अधिक असल्याचे एका नव्या अध्ययनातून समोर आले आहे.
डायबेटिक रेटिनोपॅथीशी थेट संबंध
किंग्स कॉलेज लंडनच्या डायबिटिज रिसर्च अँड क्लीनिकल प्रॅक्टिस पेपरमध्ये प्रकाशित अहवालानुसार पहिल्यांदाच डायबेटिक रेटिनोपॅथी आणि कोरोनाच्या धोक्यांदरम्यान थेट संबंध दिसून येत आहे. डोळय़ांमध्ये बिघाड होणे मधूमेहाच्या प्रमुख दुष्परिणामांपैकी एक आहे. डोळय़ांमध्ये स्मॉल ब्लड वेसेल्सना नुकसान पोहोचल्याने असे घडते. 2014 च्या एका अहवालानुसार टाइप-1 मधूमेहाने ग्रस्त 54.6 टक्के लोकांमध्ये डोळय़ांची समस्या निर्माण होते. तर टाइप-2 मधूमेहाने ग्रस्त 30 टक्के लोकांमध्ये डोळय़ांची समस्या उद्भवते.
26 टक्के वेंटिलेटरवर
अहवालानुसार सेंट थॉमस एनएचएस फौंडेशन ट्रस्टमध्ये 12 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान गंभीर आजारी झालेल्या मधूमेहग्रस्तांपैकी 67 टक्के जणांना डोळय़ांची समस्या होती. यातील 26 टक्के जणांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मधूमेहामुळे डोळय़ांची समस्या असलेल्या व्यक्तींच्या रक्तवाहिन्यांना मोठे नुकसान होते. हेच नुकसान कोरोना झाल्यावर रुग्णाला गंभीर स्वरुपात आजारी करण्यास भूमिका पार पाडते, असे संशोधक डॉ. एंतोनेला कॉर्सिलो यांनी म्हटले आहे. कोरोनाबाधित गंभीर स्वरुपात आजारी पडल्यावर त्यांच्या फुफ्फुसांच्या रक्तवाहिन्यांना गंभीर नुकसान पोहोचत असल्याचे दिसून आले आहे. याचमुळे मधूमेहग्रस्त बाधित वॅस्कुलर कॉम्प्लिकेशन्सचे अधिक शिकार ठरतात.
आयसोलेशन
जे लोक आयसोलेशनमध्ये राहतात, त्यांच्यात भूक लागल्यावर ज्याप्रकारची भावना असते, तशीच भावना निर्माण होते असा दावा मॅसाच्युसेट्स इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केला आहे. भूक लागल्यावर लोकांना अन्नाची गरज जाणवते. याचप्रकारे आयसोलेशनमध्ये अन्य लोकांची कमतरता भासते. दोन्ही स्थितींमध्ये मेंदू न्यूरोलॉजिकल दृष्टीकोनातून एकसारख्या अवस्थेत असतो. या संशोधनासाठी कोरोना महामारीच्या प्रारंभापासूनच आकडेवारी जमविण्यात आली होती.