महाराष्ट्रातील चार मल्लांचा समावेश, कुस्ती क्षेत्रात खळबळ
प्रतिनिधी / औंध
खेलो इंडिया स्पर्धेतील कुस्तीमध्ये तब्बल बारा पदक विजेते मल्ल नाडाने घेतलेल्या उत्तेजक द्रव्य (डोपिंग) चाचणीत दोषी आढळले आहेत. दोषी मल्लांची यादी नुकतीच भारतीय कुस्ती महासंघाचे कार्यालयीन सचिव विनोद तोमर यांनी प्रसिद्ध केली आहे. दोषींमध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश असून राष्ट्रीय पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मल्ल डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर खास करून ऑलम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदके मिळावी याकरिता केंद्र सरकारच्या भारतीय क्रिडा प्राधिकरण विभागाने राष्ट्रीय स्तरावर खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पदक विजेते आणि गुणवत्ता धारक खेळाडूंची निवड करून त्यांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देण्याबरोबरच आर्थिक लाभ देखील देण्यात येतो. नवीन खेळाडू तयार करण्याच्या उद्देशाने खेलो इंडिया स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावून पदक मिळवले होते. खेलो इंडियाची 2018 मध्ये दिल्ली, 2019 पुणे,2020 मध्ये गुवाहाटी येथे स्पर्धा झाली होती आणि 2020 मध्ये ओरिसा येथे युनिव्हर्सिटी गेम पार पडली.राष्ट्रीय स्तरावरील वरील चार स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंची नाडाने उत्तेजक द्रव्य चाचणी (डोपिंग टेस्ट) करण्यासाठी नमुने घेतले होते. या चाचणीत तब्बल बारा मल्ल दोषी आढळले आहेत. दोषींमध्ये महाराष्ट्रातील चार, दिल्लीचे तीन, हरियाणाचे तीन, पंजाबचा एक आणि उत्तर प्रदेशातील एका मल्लाचा समावेश आहे. दोषी आढळलेल्या मल्लांची यादी आज भारतीय कुस्ती महासंघाने प्रसिद्ध केली आहे. तसेच जे मल्ल चाचणीत दोषी आढळून आले आहेत.
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत देखील एवढया मोठ्या प्रमाणावर डोपिंग होते हे प्रसिद्ध झालेल्या अहवालातून सिध्द झाले आहे. डोपिंगमध्ये दोषी सापडल्याने राष्ट्रीय स्तरावरुन आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याच्या मल्लांच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. त्यांच्या कारकिर्दीवर डोपिंगचा डाग लागला आहे. खेलो इंडियात महाराष्ट्रातील खेळाडूंनी पदक तालिकेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्याची मान उंचावली होती. मात्र आज ग्रीको रोमनमध्ये 42 किलो, 72 किलो, 77 किलो आणि फ्रीस्टाईल प्रकारात 86 किलो वजनगटातील मल्ल दोषी आढळले आहेत. हे मल्ल दोषी सापडल्याने उंचावलेली मान शरमेने खाली गेली आहे. अनेक कुस्ती शौकिनांनी याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
खेलो इंडिया स्पर्धेतील पदक विजेत्या मल्लांची नाडाने चाचणी घेतली होती. त्याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. दोषी मल्लांची यादी प्रसिद्ध केली आहे. मल्लांना पदक आणि प्रमाणपत्र परत करावे अशी सुचना देण्यात आली आहे. दोषी आढळलेल्या मल्लावर कारवाई करण्यात येईल.
-विनोद तोमर, सचिव भारतीय कुस्ती महासंघ








