कोरोनाबाधित झाल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मेरीलँडच्या वॉल्टर रीड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना किंचित ज्वर, सर्दी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टर्स ट्रम्प यांच्यावर अन्य कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध नसलेल्या अँटीबॉडी औषधाने उपचार करत आहेत. ही अँटीबॉडी कॉकटेल ड्रग असून याचे नाव आरईजीएन-कोव-2 आहे. ट्रम्प यांना या औषधाचा 8 ग्रॅमचा डोस देण्यात आला आहे.
ट्रम्प यांच्यावरील उपचाराची वैशिष्टय़े
1 आरईजीएन-कोव2
हे औषध अमेरिकेच्या रीजेनेरन या कंपनीने तयार केले आहे. याची चाचणी लंडनमध्ये सुरू आहे. चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक असल्याचा कंपनीचा दावा आहे. या औषधात उंदिर आणि कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाच्या अँटीबॉडीचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही अँटीबॉडी मिळून कोरोनाला संपविण्यास मदत करतील, असा कंपनीचा दावा आहे. या औषधाच्या प्रभावीपणासंबंधीचा अधिकृत चाचणी अहवाल अद्याप मांडण्यात आलेला नाही.
2 अँटीबॉडी औषधावरही प्रश्नचिन्ह
ज्या दोन रुग्णांवर या अँटीबॉडीने उपचार झाले आहेत, त्यांच्यात दुष्परिणाम दिसून आल्याचे सांगण्यात येते. परंतु रीजेनेरन या कंपनीने ही माहिती उघड केली नसल्याचे वृत्त आहे. दोन्ही रुग्णांना या औषधाचा लहान डोस देण्यात आला होता. तर ट्रम्प यांचे फिजिशियन डॉ. सिएन कॉन्ले यांच्यानुसार उपचारादरम्यान अध्यक्षांना 8 गॅम आरईजीएन-कोव औषधाचा एकच डोस देण्यात आला आहे.
3 औषध सुरक्षित
हे औषध सुरक्षित असून याच्या एका डोसमुळे रुग्णाला 6 आठवडय़ांपर्यंत सुरक्षा मिळते. ही एकप्रकारे कृत्रिम अँटीबॉडी आहे. यात दोन प्रकारच्या अँटीबॉडीज आहेत. याचे काम कोरोनाला माणसांमध्ये घुसण्यापासून रोखणे आणि विषाणूंची संख्या वाढविण्यापासून रोखणे आहे. ही अँटीबॉडी विषाणूला नष्ट करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्तीला मदत करत असल्याचे ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक पीटर हॉर्बी यांनी नमूद केले आहे. चाचणीदरम्यान हे औषध सौम्य आणि गंभीर लक्षणे असलेल्या 500 रुग्णांना देण्यात आले. आतापर्यंत सुरक्षेवरून कुठलीच समस्या समोर आलेली नाही. हे अत्यंत प्रभावी औषध असून प्रयोगशाळेत याची पुष्टीही झाल्याचे पीटर यांनी म्हटले आहे.
उपचारात सामील 6 अन्य औषधे

? रेमडेसिविर : हे अँटीव्हायरल औषध असून ते इबोलावर उपचारासाठी तयार करण्यात आले होते. महामारीच्या प्रारंभापासूनच हे औषध कोरोनाबाधितांना दिले जात आहे. हे औषध शरीरात मर्स, इबोला आणि कोरोना विषाणूची संख्या वाढविण्यापासून रोखते.
? झिंक : गळय़ात त्रास होत असलेल्या रुग्णांना हे दिले जाते. कोरोनाप्रकरणी झिंक किती उपयुक्त आहे यावर संशोधन सुरू आहे. हे नुकसान पोहोचवित नसल्याने कोरोनाबाधितांना दिले जात असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.

? व्हिटामिन डी : व्हिटामिन डीची कमतरता भासल्यास संसर्गाचा धोका वाढत असल्याचे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. व्हिटामिन डीच्या सप्लिमेंट्स सुरक्षित आणि किफायतशीर असल्याने त्या घेतल्या जाऊ शकतात, असे ब्रिटनच्या आरोग्य सचिवांनीच नमूद केले आहे.
? फेमोटिडीन : हे औषध पेप्सिड या नावाने बाजारात मिळते. छातीत जळजळ होत असल्यास ते रुग्णाला दिले जाते. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाबाधितांवर याची चाचणी सुरू आहे. प्रारंभिक टप्प्याच्या चाचणीत हे औषध उपयुक्त ठरले आहे.

? मेलाटोनिन : हे औषध झोप न येत असल्यास रुग्णांना दिले जाते. 400 कोरोनाबाधितांना हे औषध देण्यात ओल, यातील काही रुग्णांचीच प्रकृती नाजुक झाल्याचे टेक्सासच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. दक्षिण फ्लोरिडाच्या विद्यापीठात या औषधावर संशोधन सुरू आहे.
? ऍस्प्रिन : हे प्रचलित वेदनाशामक औषध असून ते शरीरात विषाणूला त्याची संख्या वाढविण्यापासून रोखते. हे औषध कोरोना रुग्णाला गंभीर होण्यापासून रोखण्यास मदत करत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. याचबरोबर कोरोनाबाधितांमध्ये हृदयरोगांमुळे होणारी गुंतागुंतही रोखते.









