पार्टीच्या उमेदवाराची घोषणा
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रेटिक पार्टीने ज्यो बिडेन यांची उमेदवार म्हणून औपचारिक घोषणा केली आहे. बिडेन यांची थेट लढत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होणार आहे.
डेमोक्रेटिक पार्टीने मंगळवारी रात्री बिडेन यांच्या नावाची घोषणा केली आहे. डेमोक्रेटिक पार्टीकडून अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी नामांकन स्वीकारणे माझ्या जीवनासाठी सन्मानाची बाब असल्याची प्रतिक्रिया बिडेन यांनी ट्विट करत व्यक्त केली आहे. डेमोक्रेटिक पार्टीच्या राष्ट्रीय संमेलनाला (डीएनसी) सोमवारी रात्री प्रारंभ झाला. संमेलनाच्या प्रारंभी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना पराभूत करण्यासाठी देशाला एकजूट करण्याचे आवाहन करण्यात आले.
मिशेल ओबामांचे टीकास्त्र
ट्रम्प हे अमेरिकेसाठी एक चुकीचे अध्यक्ष आहेत. मोठी फूट पाडण्यात आलेल्या देशात आम्ही राहत आहोत. मी एक कृष्णवर्णीय महिला असून डेमोक्रेटिक संमेलनात बोलत असल्याचे मिशेल ओबामा यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील अराजकता संपुष्टात आणायची असल्यास आम्हाला बिडेन यांच्यासाठी मतदान करावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एका प्रमुख राजकीय पक्षाकडून उपाध्यक्षपदाची उमेदवारी प्राप्त करणाऱया हॅरिस पहिल्या बिगरश्वेतवर्णीय, पहिल्या भारतीय वंशाच्या आणि पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन नेत्या ठरल्या आहेत.









