वार्ताहर/ नंदगड
डोक्यावर लोखंडी बार पडल्याने खानापूर-यल्लापूर राज्य मार्गावरील व्हन्नव्वादेवी मंदिरासमोर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. जागीच मृत्यू झालेल्यामध्ये संदीप परशराम रेडेकर (वय 36, रा. नंदगड) याचा समावेश आहे.
यावर्षी मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाल्यासह तलाव तुडुंब भरले होते. खानापूर-यल्लापूर राज्यमार्गाशेजारील श्री व्हन्नव्वादेवी मंदिर लगतचा तलाव तुडुंब भरला होता. तलावाच्या बांधावरून मोठय़ा प्रमाणात पाणी गेल्याने बाजूचा रस्ता खचला होता. रस्त्याबाजूची जमीनही खचली होती. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. रस्त्याच्या बाजूला खचलेल्या जमिनीत सिमेंट काँक्रिटकची भिंत बांधून मातीचा भराव टाकण्यासाठी सरकारकडून निधी मंजूर झाला होता. गेल्या 15 दिवसापासून येथे काम सुरू होते. सुमारे 20 फूटपेक्षा खोल चर मारण्यात आली होती. पायात सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले होते. त्यावर भिंतीसाठी लोखंडी बार उभारून जाळी बांधण्याचे काम सुरू होते.
शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मृत संदीप रेडेकरसह अन्य काही कामगार बार व जाळी उभारण्याच्या कामात गुतले होते. दरम्यान बारासहित जाळी कामगारांच्या अंगावर पडल्याने ते खाली सापडले. शिवाय खड्डय़ात पाणीही होते. त्यामुळे कामगारांना जाळीबाहेर येणे अवघड झाले होते. तेथील अन्य कामगार व लोकांनी बाराखाली सापडलेल्यांना बाहेर काढले. पण जबर मार लागल्याने व पाण्यात गुदमरल्याने संदीप रेडेकर याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी कामगारांना खानापूर व बेळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
संदीप रेडेकर गवंडी व सेंट्रीगचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.
घटनेची नोंद नंदगड पोलिसांत झाली आहे. खानापूर येथील शवागारात शवविच्छेदन करून संदीपचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेची माहिती नंदगड परिसरात समजताच बघ्यांनी घटनास्थळी बरीच गर्दी केली होती..









